नगर : ``आमदार रोहित पवार यांनी देशातील नेत्यांना सल्ले देण्यापेक्षा आपल्या मतदारसंघातील रस्ते दुरुस्त करावेत. शरद पवार यांच्या खांद्यावर बसून ते स्वतःची उंची मोजतात, रोहितदादा, तुम्ही खांद्यावरून खाली उतरा, म्हणजे तुम्ही किती खुजे आहात, ते कळेल,`` अशी जहरी टीका भाजपचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.
पडळकर आज सकाळी करमाळा येथून औरंगाबादकडे जात असताना मिरजगाव येथून चालले होते. त्या वेळी रस्त्यावरील खड्डे पाहून ते चकित झाले. आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात असलेले हे खड्डे पाहून ते उतरले. ग्रामस्थांशी चर्चा करून खराब रस्त्यावर उभे राहून त्यांनी व्हिडिओ तयार केला. तो त्यांच्या ट्विटरवर शेअर करून आमदार पवार यांच्यावर जहरी टीका केली.
ट्विटरवरून ते म्हणतात, की ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या खांद्यावर बसून मी महाराष्ट्रात उंच आहे, असा अभास झालेल्या रोहित पवार यांनी खांद्यावरून खाली मतदारसंघात उतरावे. मतदारसंघातील कामांवर लक्ष द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधीपक्षनेते फडणवीस यांना सल्ले देत बसू नये, अशी टीका त्यांनी केली.
व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले आहे, की मी औरंगाबादकडे जात असताना या मतदारसंघात प्रवेश केल्यापासून रस्त्यात प्रचंड खड्डे असल्याचे दिसले. मिरजगाव येथे तर खड्डेच-खड्डे आहेत. आमदार रोहित पवार रोज देशातील नेत्यांना सल्ले देतात. ते शरद पवार यांच्या खांद्यावर बसून स्वतःची उंची मोजतात. त्यांनी खाली उतरावे, म्हणजे ते किती खुजे आहेत, ते कळेल. त्यांना साधा गावातील रस्ता करता येत नसेल, आणि देशातील नेत्यांना सल्ले देत असेल, तर उपयोग नाही. येत्या काही दिवसांत कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील रस्ते आधी दुरुस्त करावे, नंतर नेत्यांना सल्ले द्यावे, अशी टीका पडळकर यांनी केली.

