निरीक्षकाचा मुलगा चुकला, विनंती करूनही न सोडता पोलिसांनी दंड वसुलच केला - The inspector's son made a mistake and the police recovered the fine without releasing him even on request | Politics Marathi News - Sarkarnama

निरीक्षकाचा मुलगा चुकला, विनंती करूनही न सोडता पोलिसांनी दंड वसुलच केला

संजय आ. काटे
मंगळवार, 14 जुलै 2020

"माझे वडीलही पोलिस निरीक्षक आहेत, मला जाऊ द्या,' अशी विनंती तो करीत होता. मात्र, पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून कारवाई सुरूच ठेवली.

श्रीगोंदे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघण, जिल्हा ओलांडताना पासेस आदी सर्व नियम तोडणाऱ्यांना दंड व प्रसंगी पोलिस कारवाईही केली जात आहे. आज पोलिस निरीक्षकाच्या मुलालाही सोडले नाही. स्वतः निरीक्षकाने विनंती करूनही प्रशासनाने त्यांच्याकडून दंड वसूल केला.

तहसीलदार महेंद्र माळी, पोलिस निरीक्षक जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, मुख्याधिकारी शरद देवरे यांनी शहरात गस्त घालून नागरिकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काही दुचाकी अडविल्या. अनेकांकडून दंड वसुल केले. एका पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाला पकडले. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्‍यातील एका पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकाचा मुलगा दुचाकीवर श्रीगोंद्यात आला आणि पोलिसांच्या गस्तीत पकडला गेला. "माझे वडीलही पोलिस निरीक्षक आहेत, मला जाऊ द्या,' अशी विनंती तो करीत होता. मात्र, पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून कारवाई सुरूच ठेवली. इतरांप्रमाणेच दंड भरण्यावर ते ठाम होते. अखेर त्याने वडिलांना फोन केला. पोलिस निरीक्षक असलेल्या अधिकाऱ्यांनी जाधव यांना फोन केला. मात्र, "ही संयुक्त कारवाई असून, पत्रकारही सोबत आहेत. दंड भरायला सांगा. अजून खोलात गेलो, तर पुन्हा परवाना तपासावा लागेल.' असे जाधव यांनी सांगताच त्या मुलाने गुपचूप दंड भरला आणि तेथून काढता पाय घेतला.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर कडक कारवाई करण्यात येत आहे. ग्रामीण भागात रुग्ण वाढू लागल्याने प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत रुग्ण वाढू नये, यासाठी अधिकारी, पदाधिकारी रात्रंदिवस मेहनत करीत आहेत. तथापि, नागरिक ऐकत नसल्याने मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे अधिकारी धडक कारवाई करीत असून, कारवाईबाबत भेदभाव करीत नसल्याचे दिसून येत आहे.

सहकारी पोलिस निरीक्षकाचा फोन होता पण... 

"त्या' सहकारी पोलिस निरीक्षकांचा फोन आला होता. मात्र, त्यांचा मुलगा चुकला. दंड वसूल केला. तो पुणे जिल्ह्यातून येथे आला होता. कारवाईची गर्दी असल्याने केवळ दंड वसूल केला, असे श्रीगोंद्याचे पोलिस निरीक्षक दाैलत जाधव यांनी सांगिले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख