The innings of war changed! The number of patients will increase, but the defeat of the corona is certain | Sarkarnama

युद्धाचा डाव बदलला ! रुग्ण संख्या वाढेल, पण कोरोनाचा पराभव निश्चित

मुरलीधर कराळे
सोमवार, 3 ऑगस्ट 2020

कोरोना बाधित रुग्ण लवकर सापडावेत, त्यांच्या आजुबाजुंच्या लोकांना संसर्ग होऊ नये, यासाठी जास्तीत जास्त तपासण्या होणे आवश्यक आहे. यापूर्वी मालेगाव, पुणे आदी ठिकाणी हाच पॅटर्न वापरून कोरोनाची तीव्रता कमी करता आली.

नगर : कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर रोज नवीन पर्याय शोधले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आता तपासण्याच्या संख्या वाढवायच्या. त्यामुळे रोज रुग्णसंख्या वाढलेली दिसेल. परंतु लवकर रुग्ण सापडल्यामुळे त्यांच्यापासून इतरांना बाधा होणार नाही. परिणामी कोरोनाचा हरविणे शक्य होणार आहे. यासाठीच प्रशासनाने जिल्हा रुग्णालयात रोज 1 हजार चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जनतेशी फेसबुकद्वारे संवाद साधून लोकांचे मत अजमावले. लोकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. अडचणी व त्यावर काय उपाययोजना करण्यात येतात, हे स्पष्ट केले. लोकांच्या कमेंट वाचून त्यावर तातडीने उपाययोजना सुचविल्या. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी कोरोनाविषयक चाचण्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना बाधित रुग्ण लवकर सापडावेत, त्यांच्या आजुबाजुंच्या लोकांना संसर्ग होऊ नये, यासाठी जास्तीत जास्त तपासण्या होणे आवश्यक आहे. यापूर्वी मालेगाव, पुणे आदी ठिकाणी हाच पॅटर्न वापरून कोरोनाची तीव्रता कमी करता आली. त्याप्रमाणेच नगरमध्येही जास्तीत जास्त तपासण्या करून कोरोनाला हरविण्याचे युद्ध आता प्रशासनाने सुरू केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणा आणि सर्व तालुकास्तरीय यंत्रणांना निर्देश दिले आहेत. रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या माध्यमातून ही मोहीम गतिमान झाली आहे. आता जिल्हा रुग्णालयातील लॅबची क्षमता वाढल्याने प्रादुर्भाव रोखण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना अधिक गती मिळणार आहे. त्याचमुळे आता ज्यांना इतर गंभीर आजार आहेत आणि कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत, तसेच जे बाधीत रुग्णाच्या निकट संपर्कातील आहेत, अशा व्यक्तींनी त्यांची चाचणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्याठिकाणी बाधित व्यक्तींची संख्या जास्त आहे, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात तपासणी करुन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करुन कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. ज्यांना लक्षणे नाहीत, अशा कोरोना बाधित रुग्णांनी  जिल्हा  रुग्णालयात येण्याएवजी त्यांच्या जवळच्या तालुकास्तरीय किंवा महानगरपालिका क्षेत्रातील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. प्रत्यक्षात रुग्ण आहेतच. केवळ चाचण्या वाढविल्यामुळे रुग्णसंख्या वाढलेली दिसते. त्यामुळे आणखीन लोक बळी जावू नये, यासाठी त्यांना शोधने व उपाय करणे, हाच महत्त्वाचा पर्याय असल्याचे प्रशासनाला वाटते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख