Injustice on the part of Hassan Mushrif in providing funds | Sarkarnama

मुश्रीफांकडून मापात पाप ! ते 32 कोटी द्या कोरोना उपाययोजनांना

मुरलीधर कराळे
मंगळवार, 12 मे 2020

जिल्ह्यातील आमदारांनी विविध विकासकामांसाठी 32 कोटींची कामे सुचविली आहेत. मात्र, सध्या राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असून, ही कामे थांबवून हा निधी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी द्यावा.

नगर : जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कामे वाटप करताना पक्षपातीपणा केला. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनाच जास्तीत जास्त कामे दिली. भाजप आमदारांच्या मतदारसंघात अत्यंत कमी प्रमाणात कामे दिली. ते मापात पाप करतात, त्यामुळे हा निधी कोणालाच न देता थेट कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी वळविण्यात यावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा परिषदेतील गटनेते जालिंदर वाकचाैरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

याबाबत `सरकारनामा`शी बोलताना वाकचाैरे यांनी मुश्रीफ यांच्यावर निधी वाटपाबाबत आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे निवेदन पाठवून नगर जिल्ह्यातील आमदारांना निधी देताना झालेल्या अन्यायाबाबत वाचा फोडली आहे. 

वाकचाैरे म्हणाले, की जिल्ह्यातील आमदारांनी विविध विकासकामांसाठी 32 कोटींची कामे सुचविली आहेत. मात्र, सध्या राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असून, ही कामे थांबवून हा निधी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी द्यावा. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील विकासकामांना स्थगिती दिली असून, नवीन कामे मंजूर न करण्याचा आदेश दिला आहे. दुसरीकडे जिल्ह्यात लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांसाठी तब्बल 32 कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. त्यात विविध विकासकामांचा समावेश आहे. पक्षपातीपणा करून दिलेली कामे रद्द करून हा निधी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी वळविण्यात यावा. असे वाकचाैरे यांनी म्हटले आहे.

जिल्हा परिषद सदस्यांना आता कामच नाही

जिल्हा परिषदेच्या 35 कोटीचे बजेच होेते. त्यापैकी केवळ 30 टक्के निधी या वर्षी येणार आहे. तोही आरोग्य आणि पाणीपुरवठ्याला जाणार आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्हा परिषद सदस्यांना कोणतेच काम राहिले नाही. निधी वाटप करताना पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषद सदस्यांना साधे विचारले सुद्धा नाही. विश्वासात न घेता कामे वाटप केले. हे सर्व कामे करणारी एजन्सी जिल्हा परिषद आहे. म्हणजे कामे जिल्हा परिषद करणार आणि नाव आमदारांचे होणार, असेच धोरण सरकारने धरले आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना मेलद्वारे कळविले असल्याचे वाकचाैरे यांनी सांगितले.
   
पाथर्डीला निधीची तरतूदच नाही

भाजपचे आमदार ज्या मतदारसंघात आहेत, तेथे अत्यल्प निधी मंजूर केला. शेवगाव-पाथर्डीपैकी शेवगावला थोडा निधी मिळणार, मात्र पाथर्डीला काहीच मिळणार नाही. श्रीगोंद्यालाही निधी अत्यल्प आहे. या उलट कर्जत-जामखेड, राहुरी, संगमनेर अशा मतदारसंघात मात्र जास्त कामांसाठी निधी मिळणार आहे. पालकमंत्र्यांनी असे का केले. सर्वच मतदारसंघात समस्या असताना त्यांना ठराविक मतदारसंघच दिसले का, असे सवालही वाकचाैरे यांनी उपस्थित केला आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख