संगमनेर : अपत्यप्राप्तीच्या संदर्भात जाहीर कीर्तनातून केलेल्य़ा वादग्रस्त वक्तव्यामुळे समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) अडचणीत सापडले आहेत. इंदोरीकर महाराजांच्या विरोधात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा (पीसीपीएनडीटी) कायद्यांतर्गत संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल झाला होता. त्यांच्या विरोधातील सुनावणीला त्यांनी वकीलामार्फत जिल्हा सत्र न्यायालयात अपिल दाखल केले होते. त्याबाबत आज होणारी सुनावणी टळली असून, पुढील सुनावणी दिवाळीनंतर 25 नोव्हेंबर 2020 रोजी होणार आहे.
अपत्यप्राप्ती संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडिओ सोशल माध्यमांवर झळकले होते. या विधानामुळे तसेच या संदर्भात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव अॅड. रंजना पगार-गवांदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पुराव्यानिशी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार जिल्हा शल्यचिकित्सांनी खटला दाखल करण्याचे आदेश दिले होते. यामुळे त्यांच्याविरोधात घुलेवाडीच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये 19 जून रोजी संगमनेर न्यायालयात खटला दाखल केला होता.
या खटल्यात साक्षीदार असलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव ॲड. रंजना पगार गवांदे यांनी अंनिसला याप्रकरणी बाजू मांडण्याचा अधिकार असल्याचे सांगत दाखल केलेला हस्तक्षेप अर्जाला इंदुरीकर महाराजांचे वकील के. डी. धुमाळ यांनी हरकत घेतली होती. मात्र 18 सप्टेंबर रोजी न्यायालयासमोर उभयपक्षी युक्तिवाद ऐकल्यानंतर या प्रकरणी अंनिसच्या मागणीप्रमाणे त्यांना स्वतंत्र युक्तीवाद व सरकारी वकिलांना सहाय्य करण्यास परवानगी दिली होती.
न्यायालय व अन्य कामात व्यग्र असल्यामुळे या खटल्याचे आज होणारे युक्तीवाद व सुनावणी टळली असून, दिवाळीनंतर 25 नोव्हेंबर रोजी या खटल्याचे पुढील कामकाज होणार असल्याची माहिती अॅड. रंजना गवांदे - पगार यांनी दिली.
Edited By - Murlidhar Karale

