नगर : महाराजांनी संत विचारांनी आपले प्रबोधनाचे काम सुरूच ठेवावे. प्रबोधनकार निवृती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्याबाबत सरकारने संवेदनशीलता दाखवायला हवी होती. वारकरी सांप्रदाय टिकविण्यासाठी हे आवश्यक होते. कायदेशीर प्रक्रीयी सुरूच राहिल, परंतु भविष्यातील लढाईसाठी आपण महाराजांसोबत आहोत, असे आश्वासन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
ओझर (ता. संगमनेर) येथील इंदोरीकर महाराजांच्या निवासस्थानी आमदार विखे पाटील यांनी सदिच्छा भेट दली. या वेळी दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. विखे पाटील यांनी महाराजांच्या कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करून त्यांना धीर दिला. महाराजांनी विखे पाटील यांना भगवदगीतेची प्रद देवून त्यांचे स्वागत केले.
न्यायालयीन प्रक्रीयेबाबत भाष्य नाही
माध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, की महाराष्ट्रात वारकरी संप्रादायाची पताका उंचावण्याचे काम महाराज मंडळी करीत आहेत. धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून ते प्रबोधन करतात. इंदोरीकर महाराजांबाबत झाले, ते योग्य नाही. त्यामुळे महाराजांची सदीच्छा भेट घेण्यासारखी आलो होतो. त्यांच्याविषयी सुरू असलेल्या न्यायालयीन प्रक्रियेबाबत अधिक भाष्य करणार नाही. कायद्याला कायद्याचे काम करू द्यावे, परंतू महाराजांनी संत विचारांनी सुरु केलेले प्रबोधनाचे काम सुरू ठेवावे, हेच सांगण्यासाठी आज त्यांची भेट घेतली.
सरकार असंवेदनशील कसे झाले
विखे पाटील म्हणाले, की प्रत्यक्षात महाराजांनी दिलगीरी व्यक्त केली होती. सरकारने महाराजांबाबत सहानुभूती दाखवायला हवी होती, पण सध्या सरकारच असंवेदनशील झाले आहे. महाराजांनी संत विचारांनी राज्यात सुरू केलेल्या प्रबोधनाच्या कार्याला लोकमान्यता मिळाली आहे. त्यांनी सुरू केलेल्या कामाला अध्यात्मिक अधिष्ठान आहे. असेच काम त्यांनी भविष्यातही सुरू ठेवावे. या कामाला आणि भविष्यातील लढाईसाठी त्यांना आमचे पाठबळ निश्चितच राहील.
या वेळी डाॅ. विखे पाटील कारखान्याचे संचालक रामभाऊ भुसाळ, भागवत उंबरकर, विखे पाटील कृषी परिषदेचे जिल्हा अध्यक्ष सचिन शिंदे, रविंद्र गाढे आदी उपस्थित होते.

