इंदोरीकर महाराजांना आज न्यायालयात हजर राहण्याचे आदेश - Indorikar Maharaj ordered to appear in court today | Politics Marathi News - Sarkarnama

इंदोरीकर महाराजांना आज न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना आज संगमनेरच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश आहेत.

नगर : प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना आज संगमनेरच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश आहेत.

पुत्रप्राप्तीच्या एका विधानावरून इंदोरीकर महाराज अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना आज (ता. 7) न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे इंदोरीकर महाराजांना स्वत: हजर रहावे लागणार असून, वकिलामार्फत ते बाजू मांडू शकतील.

त्या विधानामुळे समाजिक क्षेत्रात याबाबत उलट-सुलट प्रतिक्रिया उठल्या होत्या. काही संघटनांनी या विधानाचा विरोध करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली होती. तर वारकरी संप्रदायातील बहुतेक सर्वच महाराज मंडळींनी इंदोरीकरांवर गुन्हा दाखल करू नये, अशी मागणी केली होती. हे प्रकरण थेट राजकारण्यांपर्यंतही जावून ठेपले. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्यावर अन्याय होऊ नये, अशी भावना व्यक्त केली होती. मात्र अंधःश्रद्धा निर्मुलन समिती व इतर संघटनांनी हा मुद्दा उपस्थित करीत सरकार दरबारी मागणी करून गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर जिल्हा आरोग्य विभागाने संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना 7 ऑगस्ट रोजी न्यायलयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, इंदोरीकर महाराजांनी यापूर्वीच दिलगिरी व्यक्त केली होती. हे प्रकरण थांबवावे, अशी विनंतीही त्यांनी केली होती. आपले काम प्रबोधनाचे आहे. काही ग्रंथांचा संदर्भ देऊन त्यांनी हे विधान केल्याचे यापूर्वी जाहीर केले होते. त्यामुळे आज महाराज आपली बाजू कशा बद्धतीने मांडतात, याकडे वारकरी संप्रदायाचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील महाराज मंडळींचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख