इंदोरीकर महाराज खटला ! अंनिसच्या अर्जाला परवानगी, सुनावणी 28 आॅक्टोबरला - Indorikar Maharaj case! Permission for Annis's application, hearing on 28 October | Politics Marathi News - Sarkarnama

इंदोरीकर महाराज खटला ! अंनिसच्या अर्जाला परवानगी, सुनावणी 28 आॅक्टोबरला

आनंद गायकवाड
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

यालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर या प्रकरणी अंनिसच्या मागणीप्रमाणे त्यांना स्वतंत्र युक्तीवाद व सरकारी वकिलांना सहाय्य करण्यास परवानगी दिली आहे.

संगमनेर : वादग्रस्त वक्तव्य केल्याने कीर्तनकार निवृत्ती देशमुख (इंदोरीकर) महाराजांवर दाखल खटल्याची आज सुनावणी होऊन अंधश्रद्धा निर्मुलन समिती (अंनिस) ने दाखल केलेल्या हस्तक्षेप अर्जाला परवानगी देण्यात आली आहे. या खटल्याची पुढील सुनावणी 28 ऑक्टोबरला होणार आहे.

जाहीर कीर्तनातून अपत्यप्राप्तीबाबत केलेल्य़ा वादग्रस्त वक्तव्यामुळे निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) त्यांच्या विरोधात प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा (पीसीपीएनडीटी) कायद्यांतर्गत संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल झाला होता. त्यांच्या विरोधातील सुनावणीला त्यांनी वकीलामार्फत जिल्हा सत्र न्यायालयात अपिल दाखल केले होते.

या प्रकरणी अंनिसच्यावतीने हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आल्याने, त्यास इंदोरीकरांच्या वकिलाने हरकत घेतली होती. या अर्जावरील आज झालेल्या सुनावणीत, अंनिसचा अर्ज मान्य करण्यात आला असून, स्वतंत्र युक्तीवाद दाखल करण्याची व सरकारी वकिलांना सहाय्य करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 28 ऑक्टोबर 2020 रोजी होणार आहे. 

इंदोरीकरांच्या तिथी व अपत्यप्राप्तीच्या वक्तव्याचे व्हीडीओ सोशल माध्यमांवर झळकले होते. या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्याविरोधात घुलेवाडीच्या ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर भवर यांनी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यान्वये 19 जून रोजी संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायालयात खटला दाखल केला होता.

या संदर्भात अ‍ॅड. रंजना पगार-गवांदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पुराव्यानिशी केलेल्या तक्रारीनुसार जिल्हा शल्यचिकित्सांनी खटला दाखल करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणात साक्षीदार असलेल्या महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव अ‍ॅड. रंजना पगार-गवांदे यांनी अंनिसला या प्रकरणी बाजू मांडण्याचा अधिकार असल्याचे सांगत, दाखल केलेल्या हस्तक्षेप अर्जाला इंदोरीकराचे वकील के. डी. धुमाळ यांनी हरकत घेतली होती.

याबाबत आज न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर या प्रकरणी अंनिसच्या मागणीप्रमाणे त्यांना स्वतंत्र युक्तीवाद व सरकारी वकिलांना सहाय्य करण्यास परवानगी दिली आहे.

अंनिसचा अर्ज न्यायालयाकडून मान्य : अॅड. गवांदे

या प्रकरणातील अंनिसच्यावतीने दाखल झालेला अर्ज न्यायालयाने मान्य केला असून, या प्रक्रियेत अंनिसला आवश्यक कागदपत्रे व लेखी म्हणणे मांडता येणार आहे. प्रथमवर्ग न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, या वक्तव्याबाबत इंदोरीकर महाराजांच्य़ा विरोधात कोणतेही पुरावे नाहीत. या त्यांच्या मुख्य तक्रारीवर यापुढे युक्तीवाद होणार आहे, असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव अॅड. रंजना पगार - गवांदे यांनी सांगितले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख