नगर : राज्य सरकारने दिलेल्या कोरोना गाईड लाईन्स पाळल्या जात नाहीत. लॉकडाउनमध्ये थोडी सुविधा मिळताच सोशल डिस्टन्सचे नियम पाळणे सोडून देण्यात येते. गाफील न राहता काळजी घ्या. इंग्लंडमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. युरोपापेक्षा भारतात कोरोनाची झळ कमी आहे. कारण भारतियांची रोगप्रतिकार क्षमता जास्त आहे. यात आपण समाधान मानत बसलो, तर कोरोना संकटाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे मास्क वापरा सोशल डिस्टन्स पाळा, असा सबुरीचा सल्ला राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
नगरमधील सुरभि हॉस्पिटलचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, आमदार निलेश लंके, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार दादा कळमकर, सुरभि हॉस्पिटलचे मुख्य संचालक डॉ. राकेश गांधी उपस्थित होते.
पवार म्हणाले, की "राजकीय क्षेत्रात एकजूटता दिसत नाही. मात्र वैद्यकीय क्षेत्रात एकजूटता दिसून येते. एकजूट झालेल्या डॉक्टरांनी नगरमधील वैद्यकीय सुविधांची स्थिती सुधारली आहे. डॉक्टर व रुग्णांत सुसंवाद आवश्यक आहे. डॉक्टरांनी रुग्णांच्या मनात विश्वास निर्माण करावा.``
म्हणूनच घरी बसू शकत नव्हतो!
शरद पवार म्हणाले, ""नगर शहराच्या वैद्यकीय गर्दीत आधुनिक सुविधांनी युक्त हॉस्पिटलची गरज भागविणारे हॉस्पिटल उभे राहिले आहे. ही कौतुकाची बाब आहे. या हॉस्पिटलमुळे वैद्यकीय सुविधांची पूर्तता होणार आहे. कोरोना हे जागतिक संकट होते. गेली 50 वर्षांत लोकांनी मला साथ दिली. त्यामुळे ते संकटात असताना मी घरी बसू शकत नव्हतो. म्हणून राज्यभर दौरे केले.''

