राहुरी : तालुक्यातील लक्षवेधी वांबोरी ग्रामपंचायतीत 40 वर्षांत दुसऱ्यांदा सत्तांतर झाले. राष्ट्रवादीचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या गटाने 17पैकी 11 जागांवर विजय मिळविला. सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नेते ऍड. सुभाष पाटील गटाला अवघ्या सहा जागांवर समाधान मानावे लागले.
वांबोरी येथे मंत्री तनपुरे यांनी राष्ट्रवादी, कॉंग्रेस व शिवसेना कार्यकर्त्यांची मोट बांधली. महाविकास आघाडीचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, माजी सरपंच नितीन बाफना, किसन जवरे, कृष्णा पटारे, शंकर मोरे, एकनाथ ढवळे, ईश्वर कुसमुडे, तुषार मोरे, पोपट देवकर यांनी केले. वांबोरीत तब्बल 40 वर्षांपासून ऍड. पाटील यांच्या गटाची सत्ता आहे. सन 2005मध्ये बाबासाहेब भिटे जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यावर त्यांच्या ताब्यात ग्रामपंचायतीची सूत्रे आली. त्यानंतर पुन्हा भिटे यांनी सत्तेचा सोपान खेचला.
उंबरे येथे 25 वर्षांनी सत्तांतर झाले. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे व्याही तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे व माजी खासदार प्रसाद तनपुरे समर्थक सुनील अडसुरे यांच्या गटांत आलटून- पालटून सत्ता राहिली. या वेळी सत्ताधारी आदिनाथ सेवा मंडळातून ढोकणे- अडसुरे गट एकत्र आले. त्यांच्या गटाला सहा जागांवर समाधान मानावे लागले. विरोधी सर्वपक्षीय गणराज मंडळाने नऊ जागांवर विजय मिळवून सत्तांतर घडविले.
राहुरी खुर्द येथे 10 वर्षांनी सत्तांतर झाले. विखे गटाचे, तनपुरे कारखान्याचे संचालक नंदकुमार डोळस यांच्या सत्ताधारी बुवासाहेब मंडळाला पराभवाचा धक्का बसला. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष निर्मला मालपाणी व मुळा-प्रवरा वीज संस्थेचे माजी संचालक आयूब पठाण यांच्या जनसेवा मंडळाने सत्ता काबीज केली. 15पैकी दोन्ही गटांचे एकेक सदस्य बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित 13पैकी 9 जागांवर राष्ट्रवादीने, तर चार जागांवर भाजपने विजय मिळविला.
Edited By - Murlidhar Karale

