किरण काळे यांना स्वातंत्र्यदिनाचे `गिफ्ट`, काॅंग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदाची संधी - Independence Day gift to Kiran Kale, Congress city district president | Politics Marathi News - Sarkarnama

किरण काळे यांना स्वातंत्र्यदिनाचे `गिफ्ट`, काॅंग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदाची संधी

मुरलीधर कराळे
शनिवार, 15 ऑगस्ट 2020

नगर शहर काँग्रेसमध्ये काल अचानक मोठे फेरबदल करण्यात आले. काळे यांच्या नावाची घोषणा थोरात यांनी नंदनवन लॉन्स येथील आयोजित पक्षाच्या बैठकीमध्ये केली.

नगर : लडाऊ, धडपड्या, सामाजिक प्रश्नांसाठी तळमळीचा, वडिलांप्रमाणेच सच्चा कार्यकर्ता म्हणून शहरात परिचित असलेले किरण काळे यांना काॅंग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदावर नियुक्ती झाल्याने त्यांना स्वातंत्र्यदिनाचे मोठे `गिफ्ट` मिळाले आहे. काल काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.

नगर शहर काँग्रेसमध्ये काल अचानक मोठे फेरबदल करण्यात आले. काळे यांच्या नावाची घोषणा थोरात यांनी नंदनवन लॉन्स येथील आयोजित पक्षाच्या बैठकीमध्ये केली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मान्यतेने हे बदल करण्यात आले.

दीप चव्हाण यांना राज्याची जबाबदारी मिळणार

याबाबत थोरात म्हणाले, की किरण काळे हे चांगले संघटक आहेत. आम्ही त्यांची जबाबदारी वाढवत आहोत. नगर शहर काँग्रेससाठी आता किरण यांच्या रूपाने तरुण नेतृत्व देत त्यांच्यावरती शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मी सोपवत आहे. माजी नगरसेवक दीप चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे शहरातील ज्येष्ठ सहकारी आहेत. त्यांना आम्ही राज्य पातळीवरती संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. नगर शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळतानाच युवक काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसची जिल्हा समन्वयकपदाची देखील जबाबदारी त्यांच्यावर आम्ही कायम ठेवत आहोत. त्यांनी शहराबरोबरच जिल्ह्यातील संघटना वाढीसाठी काम करायचे आहे. नगर शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे मजबूत संघटन काळे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरात उभे राहिल, असा विश्वास या वेळी थोरात यांनी व्यक्त केला.

मी जिवाचं रान करणार : काळे

निवडीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना किरण काळे म्हणाले की, थोरात यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी मी जिवाचं रान करणार आहे. नगर शहरामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. काँग्रेसची नगर शहरात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. यापूर्वी असणारे सर्व मतभेद, गट-तट विसरून सर्वांनी एकत्र येण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. माझ्या निवडीमध्ये युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांचा सिंहाचा वाटा आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख