शिर्डी : साईसंस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती झाली, त्यावेळी ते आयएएस अधिकारी नव्हते. त्यामुळे त्यांची नियुक्ती उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणारी आहे. येथे केडर मधिल सनदी अधिकारी नियुक्त करावा, असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती एस. डी. कुलकर्णी यांनी काल दिले.
साई संस्थानचे माजी विश्वस्त उत्तमराव शेळके यांनी जनहित याचिका दाखल करून येथील यापूर्वीचे मंडळ हटवून नवे मंडळ नियुक्त करण्याची मागणी केली होती. त्यावर अंतरीम आदेशान्वये उच्च न्यायालयाने साईसंस्थानचा कारभार पहाण्यासाठी नगरचे प्रधान जिल्हा न्यायाधिश, नाशिकचे महसूल सहआयुक्त, नगरचे सहधर्मादाय आयुक्त व साईसंस्थानचे मुख्य कार्यकारीअधिकारी यांचा समावेश असलेली तदर्थ समिती गठीत केली होती.
हेही वाचा... सहकारी संस्थांच्या सभेला थोरात उपस्थित राहणार
ही समिती सध्या संस्थानचा कारभार पहाते. दरम्यानच्या काळात याचिकाकर्ते शेळके यांनी दिवाणी अर्ज दाखल करून संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी केडर मधिल सनदि अधिकारी नेमावा, अशी मागणी केली. त्यावर उच्च न्यायालयाने काल राज्य सरकारला वरील आदेश दिले.
हेही वाचा... नगरची वाटचाल लाॅकडाऊनच्या दिशेने
साईसंस्थान मध्ये येत्या दोन महिन्यात नवे विश्वस्त मंडळ येईल. असे कालच्या सुनावणीच्या वेळी सरकारी पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड.प्रज्ञा तळेकर, अॅड.उमाकांत औटे व अॅड.अजिंक्य काळे हे काम पहात आहेत. तर सरकारच्या वतीने अॅड.डी.आर.काळे हे काम पहात आहेत.
हेही वाचा...
"साईसंस्थान रुग्णालयाचे कोविड रुग्णालय करावे'
राहाता : शिर्डी व राहाता शहरात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या लक्षात घेऊन साईसंस्थान रुग्णालयाचे तातडीने कोविड रुग्णालयात रुपांतर करावे. आरोग्य विभागाला सतर्कतेने काम करण्याची सुचना द्यावी. तसेच आरटीपीसीआर व अँटी जेन चाचण्यांना परवानगी द्यावी, अशा मागण्या भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना केल्या आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांचीही डॉ. पिपाडा यांनी भेट घेतली. निवेदनात म्हटले आहे, की साईसंस्थानचे सध्याचे कोविड सेंटर व लोणी येथील कोविड सेंटरमध्ये बेड शिल्लक नसल्याने सामान्य रुग्णांवर महानगरात धाव घेण्याची वेळ आली आहे. तेथील खर्च परवडणारा नाही. त्यामुळे साईसंस्थान रुग्णालयाचे तातडीने कोविड रुग्णालयात रुपांतर करावे, अशी मागणी पिपाडा यांनी केली आहे.
Edited By - Murlidhar Karale

