तोंडाला मास्क नसेल, तर शंभर रुपये खिशात हवेच ! - If you don't have a face mask, you need a hundred rupees in your pocket! | Politics Marathi News - Sarkarnama

तोंडाला मास्क नसेल, तर शंभर रुपये खिशात हवेच !

मुरलीधर कराळे
बुधवार, 11 नोव्हेंबर 2020

मास्क न वापरणारे, सोशल डिस्टन्सिंगचे न पाळणाऱ्यांवर आता पोलिस दंडात्मक कारवाई करणार आहेत. त्यांच्याकडून प्रत्येकी शंभर रुपये दंड वसूल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिला आहे.

नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पोलिसांना दिला आहे. तसा आदेश डॉ. भोसले यांनी काढला आहे. सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडणे, मास्क न वापरणाऱ्या लोकांकडून शंभर रुपये दंड वसुल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने नागरिक कोणतीही काळजी घेताना दिसत नाहीत. दिवाळीमुळे बाजारपेठेत खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कोणीही शासकीय नियमांचे पालन करीत नाही. मास्क न वापरणारे, सोशल डिस्टन्सिंगचे न पाळणाऱ्यांवर आता पोलिस दंडात्मक कारवाई करणार आहेत. त्यांच्याकडून प्रत्येकी शंभर रुपये दंड वसूल करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिला आहे. 

सध्या दीपावलीच्या खरेदीसाठी नगर शहरात व प्रत्येक तालुका पातळीवर मोठी गर्दी होत आहे. सरकारने कितीही कठोर नियम केले, तरीही नागरिकांकडून या नियमांची पायमल्ली होताना दिसते. सध्या नगरचा कापडबाजार गर्दीने खच्चून भरत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. रस्त्यातवर तंबाखू खाऊन थुंकणारे कमी नाहीत. अशा परिस्थितीत कोरोना अधिक फैलावण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये रोज दीडशे रुग्ण सापडू लागले होते. ते आता अडीचशेच्या दरम्यान जाऊ लागले आहेत. हळूहळू कोरोना वाढतो आहे. नगर तालुक्यातील अकोळनेरमध्ये तर एकाच दिवशी 44 रुग्ण आढळून आले होते. संगमनेर शहरातही कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कमी होणारे रुग्णांचा आकडा काही दिवस दोनशेच्या दरम्यान स्थिर होता. आता मात्र तो वाढू लागला आहे. त्यामुळे नगरकरांनी काळजी घेण्याशिवाय पर्याय नाही.

याबाबत अधिक कठोर होत जिल्हाधिकारी डाॅ. भोसले यांनी पोलिसांना अधिकार दिले असून, कोणीही विनामास्कचा आढळल्यास त्याच्याकडून लगेचच शंभर रुपये दंड वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे दहा रुपयांचे मास्क तोंडाला लावलेले केव्हाही बरे, असेच म्हणण्याची वेळ आली आहे.

असे असले, तरीही कोरोनामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी कोरोना वाढणार नाही, यासाठी विशेष प्रयत्न करावेत. प्रत्येकाने आपापली काळजी घेतली, तरी कोरोनाला ब्रेक बसेल. त्यामुळे येत्या काही दिवसांत गर्दीच्या काळात शासनाने घालवून दिलेल्या नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख