तोंडाला मास्क नसल्यास 500 रुपयांना मुकाल, वऱ्हाडींचेही थर्मल स्कॅनिंग आवश्यक - If you don't have a face mask, pay Rs. 500. The bride also needs thermal scanning | Politics Marathi News - Sarkarnama

तोंडाला मास्क नसल्यास 500 रुपयांना मुकाल, वऱ्हाडींचेही थर्मल स्कॅनिंग आवश्यक

मुरलीधर कराळे
मंगळवार, 30 मार्च 2021

लग्न समारंभासाठी फक्‍त 50 व्यक्‍तींनाच एकत्र येण्यास परवानगी राहिल. मंगल कार्यालयाचे कर्मचारी, आचारी यांच्यासह पन्नास पेक्षा जास्त व्यक्‍तींना एकत्र येता येणार नाही.

नगर : मास्क नसल्यास आता दोनशे ऐवजी पाचशे रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्‍ती एकत्र आल्यास प्रत्येकी एक हजार रुपये दंड, रात्रीच्या संचारबंदीत दोन तासाची कपात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कोरोना प्रतिबंधासाठी घेतला आहे. 

कोरोना प्रतिबंधासाठी कठोर उपाययोजना जिल्ह्यात लागू केल्या आहेत. रविवारी (ता.28) रात्री 12 वाजल्यापासून या उपाययोजना (ता. 15) एप्रिलपर्यंत लागू राहणार आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क नसल्यास आता पाचशे रुपये दंड आकारला जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

पोलिस नाईक ते पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना हा दंड वसूल करण्याचा अधिकार राहिल. दोन व्यक्‍तींमध्ये सहा फुटांचे अंतर नसेल आणि पाच पेक्षा जास्त व्यक्‍ती एकत्र आल्यास प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. रात्री आठ ते सकाळी 7 वाजेपर्यंत अत्यावश्‍यक सेवेतील व्यक्‍तींशिवाय इतरत्र फिरण्यास बंदी राहणार आहे. सर्व प्रकाराच्या धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे उल्लंघन झाल्यास संबंधित मालकांना दंड केला जाणार आहे. हॉटेल, रेस्टारंट, सिनेमागृह, नाट्यगृह, मॉल्स यांना रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत खुले ठेवता येणार नाही. हॉटेल चालक रात्री आठ नंतर पार्सल सुविधा देऊ शकतात. 

लग्न समारंभासाठी फक्‍त 50 व्यक्‍तींनाच एकत्र येण्यास परवानगी राहिल. मंगल कार्यालयाचे कर्मचारी, आचारी यांच्यासह पन्नास पेक्षा जास्त व्यक्‍तींना एकत्र येता येणार नाही. 

लग्न समारंभातील प्रत्येक व्यक्‍तीचे थर्मल स्कॅनरद्वारे स्क्रिनिंग करणे बंधनकारक आहे. टेबल, खुर्च्या, पाण्याचे नळ, हाताळण्यात येणाऱ्या सर्व वस्तूंचे पुष्ठभाग निर्जंतुकीकरण करणे आवश्‍यक आहे. लग्न समारंभात दोन व्यक्‍तींमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवावे लागेल. अंत्यविधीसाठी फक्‍त 20 व्यक्‍तींना एकत्र येता येणार आहे. स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांनी याबाबत लक्ष द्यावे. 

आरोग्य सेवा आणि अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर कार्यालये, खासगी कार्यालयांनी 50 टक्के कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी. बसमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशाला पाचशे रुपये दंड करण्याचा अधिकार संबंधित प्राधिकरणाला दिला आहे. 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख