लाचारी पत्करून राहण्यापेक्षा हिंमत असेल, तर काॅंग्रेसने बाहेर पडून दाखवावे - If there is more courage than helplessness, then Congress should show it | Politics Marathi News - Sarkarnama

लाचारी पत्करून राहण्यापेक्षा हिंमत असेल, तर काॅंग्रेसने बाहेर पडून दाखवावे

सतीश वैजापूरकर
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

महाविकास आघाडी सरकारची शिवजयंती नियमावली महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्‍का पोचविणारी आहे. ती तातडीने मागे घ्यावी.

शिर्डी ः "लाचारी पत्करून सरकारमध्ये राहण्याची वेळ कॉंग्रेस पक्षावर आली आहे. हिंमत असेल, तर त्यांनी बाहेर पडून दाखवावे. अभिनेत्री पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येबाबत शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याचे नाव समोर आले आहे. त्याच्या ऑडिओ क्‍लिप राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे भारतीय जनता पक्षाने दिल्या आहेत. अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात का ठेवता? त्यांचे समर्थन करणेही अशोभनीय आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सत्तेत राहण्यासाठी किती तडजोडी करायच्या, हे आता ठरविले पाहिजे,'' असे मत आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

विखे पाटील म्हणाले, "महाविकास आघाडी सरकारची शिवजयंती नियमावली महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्‍का पोचविणारी आहे. ती तातडीने मागे घ्यावी. वीजजोड तोडून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळू नका. सिनेअभिनेत्रीच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या मंत्र्याला पाठीशी घालू नका.'

हेही वाचा... हे सरपंच की हिरो

विखे म्हणाले, "कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या पदभार सोहळ्याला गर्दी चालते आणि शिवजयंतीला नाही, हा काय प्रकार आहे? ज्यांचे नाव घेऊन सत्तेत आलात, त्यांच्या जयंतीसाठी नियमावली का करता? महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टीने ही अतिशय धक्‍कादायक आणि चीड आणणारी बाब आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांचे वीजजोड तोडता. शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. कॉंग्रेसचे अस्तित्व या सरकारमध्ये दिसत नाही. त्यांच्या इशाऱ्यांना किंमत दिली जात नाही. त्यांनी इशारे देणे बंद करावे.'' 

हेही वाचा.. पिचडांना धक्का, गायकर राष्ट्रवादीत जाणार

"शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जोर्व्याचे सरपंच रवींद्र खैरे मनापासून आमच्याबरोबर होते. काहींनी दहशत निर्माण करून त्यांना स्वत:कडे ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला,'' असे ते म्हणाले. 

दरम्यान, विखे पाटील यांनी टीका केल्याने त्याची चर्चा महाराष्ट्रभर होऊ लागली आहे. जोर्व्याच्या सरपंचाबाबतही त्यांनी स्पष्टीकरण करून राजकारणाची नवी समिकरणे बदलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

 

Edited By - Murlidhar karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख