जिल्हा बॅंकेत कोणी गडबडी केल्या, थांबा त्यांची गंमतच काढतो ! अजित पवार यांंचा पिचडांना टोला

जवळचे सहकारी सोडून दुर गेल्याने करमत नव्हते,,मात्रआता अकोलेकडे बघितले, तर निश्चित बरे वाटते.
NCP 1.jpg
NCP 1.jpg

अकोले : अकोले तालुक्यातील विकासकामे करुन तालुक्याचा कायापालट मधुकर पिचडांना पाहुन केला नाही, तर पिचड राष्ट्रवादीत होते. तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेसमय होता व तालुक्यातील जनता पवार साहेबांवर प्रेम करत होती, म्हणून केला असल्याचे सांगत जिल्हा बॅंकेत कोणी गडबडी केल्या मला माहित आहे, थोडे दिवस जाऊ द्या, चांगली गंमत काढतो, असा टोला पिचड यांचे नाव न घेता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.

मुंबईतील राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष कार्यालयात आज दुपारी १२ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राष्ट्रवादी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, यांच्या हस्ते नगर जिल्ह्यातील सहकारातील ज्येष्ठ नेते जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी आमदार डॅा. किरण लहामटे, आमदार बाबासाहेब पाटील, घनश्याम शेलार, जिल्हा बॅंकेचे संचालक अमित भांगरे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदिप वर्पे, युवकचे अध्यक्ष कपिल पवार, जेष्ठ नेते अशोक भांगरे तसेच मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाले, की जवळचे सहकारी सोडून दुर गेल्याने करमत नव्हते,,मात्र आता अकोलेकडे बघितले, तर निश्चित बरे वाटते. जीवाभावाची माणसं इकडे तिकड गेली होती, आपल्याकडे ग्रामीण भागात म्हणतात ना, दिवसभर कुठंही फिरत बसलं, तरी संध्याकाळी चावडीवरच येणार, तसे आहे. मात्र आता गायकर साहेब आता इथून पुढे कुठे जाण्याचा विचार करु नका. तुम्हाला आता तालुका राष्ट्रवादीमय करुन थांबायचे नाही, तर पूर्ण नगर जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसमय करायचा आहे.

विधानसभा निवडणुकीपुर्वी आपण वैभव पिचडांना खूप समजावले. तुम्ही तरुण आहात चूक करू नका, मात्र त्यांनी मला हा म्हणाले, आणि नको तो निर्णय घेतला. मग आपल्याकडे काट्याने काटा काढायची पद्धत आहे. त्यानुसार आपण तालुक्यात पाहणी करून शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने डॅा. किरण लहामटे यांना उमेदवारी दिली. त्यावेळी तालुक्यात प्रचाराला सभेला येताना इकडे तिकडे गेलेल्यावर बोलावे लागले. आता तालुक्याचे विकासाचा बॅकलॅाग भरून काढायचा आहे. आता नवीन प्रवेशावर हलक्या कानाचे होउ नका, नव्या जुन्याचा मेळ घालत, नवी-जुनी, तरुण व अनुभवी अशा लोकांना विविध संस्थेत संधी द्यावी. विकासाची कामे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षातच केली जातात.

या वेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, की ज्याच्या सातबारा उताऱ्यावर राष्ट्रवादी नाव आहे, ते सीताराम गायकर राष्ट्रवादी काॅंग्रेस सोडून गेले होते. असे कधी वाटलेच नाही. हिमालयासारखे उत्तुंग नेतृत्व असलेले शरद पवार यांच्या नेतृत्वाला राज्यातील जनतेने साथ देत ज्यांनी आपले सरकार येणार नसल्याचे भाकित करत पक्ष सोडला, त्यांना धडा देत राज्यात आपले तीन पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार आणले. याच पक्ष कार्यालयात दिड ते दोन वर्षापूर्वी एक वेळ अशी होती, इथे कोणी थांबायला तयार नव्हते. मात्र आता पुन्हा वरदळ सुरु झाली आहे.

मुश्रीफ म्हणाले, की कुटुंबातील एखादा मुलगा रूसून गेला व तो पुन्हा आल्यासारखे आहे. विधानसभेवेळी शरद पवारांना त्याचे जवळचे शिलेदार सोडून गेले, तेव्हा फार मोठ्या वेदना झाल्या. त्यात राष्ट्रवादिच्या प्रत्येक कार्यकर्त्याला वेदना झाल्या, त्याची फेड सर्व सामान्य माणसांनी निवडणुकीत दाखवून दिली. त्याचे उत्तम उदाहरण अकोले विधानसभा मतदार संघातील लहामटे आहेत.          

आता राष्ट्रवादी काॅंग्रेसची मेगा भरती सुरु...!

विधानसभा निवडणूकीपुर्वी राज्यात भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेस, शिवसेना पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेत मेगाभरती केली होती, त्यात सुरवतीलाच राज्यातील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी भाजपात प्रवेश करुन अकोलेतुन सुरूवात केली. त्याचीच परतफेड करत आज राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने भाजपातील नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश करत मेगा भरती सुरु झाली असून, याची सुरूवातही आज अकोलेतुनच होत आहे. पिचडांचाच उजवा हात समजले जाणारे गायकर यांनी त्याच्या अनेक कार्यकर्त्याबरोबर भाजपा सोडत राष्ट्रवादी काॅंग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.
 

Edited By - Murlidhar Karale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com