कर्जत : 'जिथं शेतकऱ्यांना मदत लागेल तिथं आपण मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारण्यात येत असलेल्या नवीन व्यवसायासाठीही ताकद देऊ, पण कुणी एखाद्यावर अन्याय करत असेल, तर त्याची कसलीही गय करणार नाही, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला.
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील छत्रपती जिनिंग अॅण्ड प्रेसिंग प्रा. लिमिटेडच्या शासकीय हमीभाव कापूस खरेदी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक अॅड शिवाजी दसपुते, औरंगाबाद येथील विभागीय व्यवस्थापक व्ही. बी. थिगळे तसेच मान्यवर उपस्थित होते.
आमदार पवार म्हणाले, की या कापुस केंद्रामुळे हमीभाव मिळणार आहे, यातून अनेकांना रोजगारही मिळेल. कापूस खरेदीमध्ये सर्वांना समान न्याय मिळावा, हे कापूस खरेदी केंद्र शेतकऱ्यांना आधार केंद्र व्हावे. गेल्या वर्षी अडचणी असूनही हे केंद्र सुरू ठेवण्यात आले होते. राज्यात १०० ते १५० केंद्रे सुरू होणे अपेक्षित असताना फक्त ३० केंद्रे सुरू झाली आहेत.
कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील केंद्र सुरू करताना अनेक अडचणी आल्या, मात्र आमदार रोहित पवार यांनी प्रयत्न करून हे केंद्र सुरू केले. सध्या कापसाचा बाजारभाव कमी असला, तरी शेतकऱ्यांना हमीभाव मिळणार असल्याने फायदा होणार आहे. या केंद्रावर दोन ते तीन तालुक्यातून कापूस खरेदी करण्यात येणार आहे. मागील वर्षी ८५ हजार क्विंटल कापुस शेवटपर्यंत खरेदी करण्यात आला. यावर्षी हमी भावाने तब्बल २ लाख क्विंटलपर्यंत कापुस खरेदीचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कुणी एखाद्यावर अन्याय करीत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा पवार यांनी कोणाला दिला, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा आहे. शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा, ही प्रमुख मागणी शेतकऱ्यांची आहे. असे असले, तरी या वर्षी योग्य भाव मिळत ऩसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. अशा परिस्थितीत विरोधकही त्याला खतपाणी घालीत असल्याचे मानले जाते. हाच धागा पकडून आमदार पवार यांनी विरोधकांना टोला हाणला असल्याचे मानले जात आहे.
Edited By - Murlidhar Karale

