बिहारमध्ये सत्ता न आल्यास गरिबांकडून लसीचे पैसे घेणार का? - If Bihar does not come to power, will it take vaccine money from the poor? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

बिहारमध्ये सत्ता न आल्यास गरिबांकडून लसीचे पैसे घेणार का?

आनंद गायकवाड
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

मग महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून त्यांना कोरोनावरील लस देणार नाही का? केंद्र सरकार गोरगरिबांकडून कोरोना लसीचे पैसे घेणार आहे का?

संगमनेर : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता आल्यास मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देऊन भाजपाने कोरोना लसीचेही राजकारण केले आहे. सर्व राज्यांना मोफत लस देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असताना निवडणुका आहेत, म्हणून फक्त बिहारला मोफत लस देणार, मग महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून त्यांना कोरोनावरील लस देणार नाही का? केंद्र सरकार गोरगरिबांकडून कोरोना लसीचे पैसे घेणार आहे का? असे प्रश्न विचारून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचा समाचार घेतला आहे.

भाजपाच्या मोफत लसीच्या आश्वासनाचा समाचार घेताना थोरात म्हणाले, की कोरोना महामारीने जनता त्रस्त आहे. अजून कोरोनाची लस उपलब्ध झालेली नाही. त्यातच मतासाठी मोफत लसीचे गाजर दाखवणे, हे भाजपाने ताळतंत्र सोडल्याचा प्रकार आहे. प्रत्येक भारतीयाला कोरोनाची लस मोफत मिळणे, हा त्यांचा अधिकार आहे, तो त्यांना मिळालाच पाहिजे. मंगळवारी राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्व भारतीयांना लस देण्यासाठी सरकारची तयारी आहे, असे सांगितले असताना बिहारच्या लोकांनाच मोफत लस देऊ, असे आश्वासन जाहिरनाम्यात देण्याचा भाजपाचा हेतू काय. कोरोना लसीसाठी भारतीयांचा पैसा खर्च होणार आहे, मग तो फक्त बिहारसाठीच का. इतर रायात लस देणार नाही? का त्यासाठी लोकांना पैसे मोजावे लागतील. हा केवळ जनतेच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा प्रकार आहे, अशी टीका थोरात यांनी केली आहे.

मोदींचे महाराष्ट्रावर प्रेम नाही का

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान विरोधी पक्षनेते व बिहार भाजपाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी, मोदीजींचे बिहारवर जास्त प्रेम आहे असे म्हटले होते. मग महाराष्ट्रावर मोदींचे प्रेम नाही का? का कमी प्रेम आहे? आणि जर प्रेम कमी असेल किंवा प्रेमच नसेल तर महाराष्ट्राला मोफत कोरोना लस देणार नाही का? असे प्रश्नही थोरात यांनी उपस्थित केले आहेत.

निवडणुका आल्या की वारेमाप घोषणा करण्याचा रोग भाजपाला जडला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत बिहारला 1.25 लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली होती, त्या पॅकजचे काय झाले, याचा बिहारच्या जनतेला मागील पाच वर्षात अनुभव आला असून, त्यांची फसवणूक झाली आहे हे समजण्याइतपत बिहारची जनता सुज्ञ आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्यावेळीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले, त्याचे काय झाले. ते आज पाहतच आहोत. ही सगळी जुमलेबाजी असून, त्यात भाजपाचा हातखंडा आहे, अशी टीका थोरात यांनी केली आहे.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख