निवडणुकीत कोणी दमबाजी केल्यास गाठ माझ्याशी ! आमदार पवार यांचा दम कोणाला - If anyone is arrogant in the election, tie the knot with me! MLA Rohit Pawar's breath | Politics Marathi News - Sarkarnama

निवडणुकीत कोणी दमबाजी केल्यास गाठ माझ्याशी ! आमदार पवार यांचा दम कोणाला

वसंत सानप
मंगळवार, 29 डिसेंबर 2020

मतदारसंघातील बिनविरोध ग्रामपंचायतीस 30 लाख रुपये देण्याची घोषणा आमदार पवार यांनी केली.

जामखेड : ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक पातळीवर सर्वसामान्य लोकांना कुणी दमबाजी केली, अन्य मार्गाचा अवलंब करून त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर त्यांची गय केली जाणार नाही. असा प्रकार कुणीही करू नये, अन्यथा लक्षात ठेवा, गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दम आमदार रोहित पवार यांनी दिला. हा दम कोणाला उद्देशून दिला, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

याबाबत आमदार पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की ग्रामपंचायत बिनविरोध करण्यास सर्वांनी सहकार्य करावे. अनुचित प्रकार करू नये. मतदारांना, इच्छुकांना दमबाजी करू नये. मतदारसंघातील बिनविरोध ग्रामपंचायतीस 30 लाख रुपये देण्याची घोषणा आमदार पवार यांनी केली.

कोरोनामुळे अगोदरच आपल्याला खूप मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. त्यामुळे गावातील गट-तट बाजूला ठेवून निवडणुकीवर होणाऱ्या खर्चास फाटा द्यावा. बिनविरोध निवडणूक करणाऱ्या गावांना 30 लाखांचा विकासनिधी देणार असल्याची घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली. 

कर्जत तालुक्‍यातील 56, तर जामखेड तालुक्‍यातील 49 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या अनुषंगाने पवार यांनी ही घोषणा केली. बिनविरोध होणाऱ्या मोठ्या ग्रामपंचायतींना सीएसआर फंडातूनही अधिकचा निधी देणार असल्याचे पवार म्हणाले. अडचणीच्या काळात पवार यांनी पक्ष, गट-तट, राजकारणविरहित भावनेतून नेहमीच मदतीचा हात दिला.

गावपातळीवर अधिक योजना व त्यांची माहिती पोचविण्यासाठी राष्ट्रवादी विकास समित्या स्थापन केल्या. गावांना सक्षम करण्यासाठी त्यांच्याकडून विविध संकल्पना राबविल्या जात आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून निघते. गावाच्या सलोख्यास बाधा पोचते. गटा-तटाच्या राजकारणात गावाचा विकास खुंटतो. 

सध्याच्या काळात प्रत्येक व्यवसायाला, काम करणाऱ्या नागरिकांना कोरोनाचा फटका बसला आहे. प्रशासनावरही त्याचा ताण अधिक वाढला आहे. अनेकांचे रोजगार गेले. अनेकांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागला. त्यामुळे बिनविरोध निवडणूक प्रक्रिया गावाच्या हिताची ठरणार आहे. त्यामुळे पवार यांनी बिनविरोध निवडणुका करण्याचे आवाहन केले आहे. 
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख