सुंदर व्हायचंय, पण प्रदुषणानं हतबल झालेय! `सीनामाई`चं दुःख

प्रदुषणानं माझं नाव बदनाम झालंय. हे प्रदुषणाचे फटकारे सोसत मी सोलापूर, परांडा जिल्ह्यात जातेय. तिथं माझं काैतुक होतं. पण नगरला मात्र मला पाहिलं की लोक नाक मुरडतात.
seena 2
seena 2

नगर : हॅलो नगरकर, मी सीना. काल तुम्हाला माझा जन्म (उगम) कसा झाला ते सांगितलं. माझा इतिहास तुम्ही पाहिला. पण आज मी तुम्हाला माझी पीडा सांगणार आहे. माझ्यावर होणारा अन्याय, नगरकरांकडून होणारा प्रदुषणरुपी अत्याचार तुमच्यापुढं मांडणार आहे. मी काय करू. प्रदुषणानं माझं नाव बदनाम झालंय. हे प्रदुषणाचे फटकारे सोसत मी सोलापूर, परांडा जिल्ह्यात जातेय. तिथं माझं काैतुक होतं. पण नगरला मात्र मला पाहिलं की लोक नाक मुरडतात. तोंड दाबतात. आता मी काय करू. 

आधी मी खूप शुद्ध होते. नगरची स्थापना होण्यापूर्वी माझं रुप अतिसुंदर होतं. अहमदशहा माझ्या तिरावर आला. त्याला माझ्या पाण्याने भुरळ घातली. माझ्या तिरावर सुंदर शहर वसवावं, असं त्याला वाटलं. त्यामुळंच त्यानं 28 मे 1490 रोजी `कोटबाग निजाम` हा राजवाडा बांधून नगरची स्थापना केली. अहमदशहाच्या नावावरूनच अहमदनगर हे नाव पडलं. 1494 मध्ये शहर स्थापन झालं. पुढे निजामशहाची राजधानी बनलं. त्या काळी प्रदुषण नव्हतं.  

हळूहळू शहर वाढत गेलं. सांडपाणी, गटारांचा प्रश्न पडला. हे पाणी सोडायचं कुठं, याबाबत विचार न करता थेट माझ्या पात्रात सोडलं. व्हायचं तेच झालं. हळूहळू नगर वाढत गेलं. हे शहर नावारुपाला आलं. कालांतराने मोठं शहर होऊन सांडपाण्याचा प्रश्न उपस्थित झाला. शहरातील सर्व सांडपाणी माझ्या पात्रात सोडल्यामुळं मी प्रदुषित झाले. माझ्यातील प्रदुषणामुळं माझ्या तिरावर लोक राहण्याचे टाळू लागले. परंतु शहराच्या लगत माझ्या दुसऱ्या तिरावर हातभट्ट्या सुरू झाल्या. अवैध दारुचे अड्डे सुरू झाले. माझ्या अंगा-खांद्यावर खेळणाऱ्या काट्या हे या लोकांचे आश्रयस्थान बनलं. मी तरी काय करू. त्यामुळे मी अधिक बदनाम झाले.

तुम्हाला सांगू का, 2013 सालची गोष्ट आहे ती. नगर शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडण्यात येतं. त्यामुळे मी प्रदुषित झालेय. त्याचा परिणाम नगर तालुक्यातील 13 गावांना बसला. रुई छत्तीशी, मठपिंप्री, हतवळण, शिराढोण, दहिगाव, वाळुंज, वाटेफळ, साकत, वाकोडी, निमगाव, बुरुडगाव, घोगरगाव आदी गावांच्या त्यामध्ये समावेश आहे. या गावांनी काय केलं माहित आहे का, थेट जिल्हा परिषदेत तक्रार दाखल केली. खराब पाण्यामुळे विहिरी, कुपनलिकांचे पिण्याचे पाण्याचे स्त्रोत खराब झाले. एव्हढेच नव्हे, तर या पाण्याने शेतीलायक जमीनीही खराब झाल्याची तक्रार केली होती. जिल्हा परिषदेने तज्ज्ञांकडून तपासणी करून त्याच्या अहवालाच्या अधारे महापालिकेला पत्र दिलं. त्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठकही झाली होती. महापालिकेला सांडपाणी सोडण्यासाठी सीनाशिवाय पर्याय नाही, तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा उभी करण्यासाठी निधीची कमतरता होती. त्यामुळे महापालिकेनं त्या बैठकित असमर्थता दर्शविली. त्यामुळं अखेर काही उपाययोजना सुचविण्यात आल्या होत्या. नगर शहराच्या जवळ लहान-लहान बंधारे घालून पाण्याचे स्थिरीकरण करावं. त्यामुळं गाळ साठून पाण्याचा निचरा होईल, असं ठरलं. मात्र यावरही महापालिकेनं विशेष कार्यवाही केली नाही.

एव्हढं प्रकरण लांबलं, की ते थेट कोर्टात गेलं. महापालिका प्रतिसाद देत नसल्याचं पाहून अखेर जिल्हा परिषदेनं नगरच्या दिवाणी न्यायालयात महापालिकेविरुद्ध दावाच दाखल केला. त्यावेळी महापालिकेला म्हणणे सादर करण्याची नोटीस दिली. त्यानंतर लगेचच महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने महापालिकेने यावर उत्तर दिले नव्हते. त्यामुळे कोर्टात याबाबतीत कामकाज ठप्प झालं होतं.

शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडण्यात येतं. याबाबत हरित लवाद व महाराष्ट्र राज्य प्रदुषण नयमंत्रण मंडळाने महापालिकेला वारंवार नोटीसा पाठविल्या. त्यामुळे अखेर महापालिकेने काहीतरी हालचाल करायला सुरुवात केलीय. सांडपाणी व मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प उभारायला सुरुवात केलीय. त्यासाठी शहरात भुयारी गटारांचे काम सुरू केलंय. या गटाराद्वारे हा मैला व पाणी थेट पाईपलानने वाकोडीजवळ एका ठिकाणी सोडण्यात येणार आहे. तेथे त्यावर प्रक्रिया होऊन आसपासच्या शेतकऱ्यांना त्यातून निघालेले पाणी मोफत देण्याचं नियोजन केलंय. हा प्रकल्प झाला नाही बरं का, त्याचं काम सुरू आहे. महापालिका म्हणते अंतीम टप्प्यात आहे, पण खरं का खोटं, `शासकीय काम अन थोडं थांब` म्हणतात ना हे असं. अजून किती दिवस वाट पहावी लागतेय कुणास ठावूक. पण अधिकारी म्हणतात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लाॅकडाऊनमुळं काम थांबलंय. नसता आतापर्यंत पूर्ण झालं असतं. त्यांना आता निमित्तच झालंय म्हणा. होईल त्या वेळी होईल, असंच काहीसं म्हणावं लागेल.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आता पुढाकार घेतलाय. माझं शुद्धीकरणासाठी एक पाऊल टाकणार आहेत ते. सध्या नगरकर दररोज सुमारे साडेतीन कोटी लिटर मैलामिश्रीत पाणी माझ्या उदरात सोडतात. भुयारी गटार व मलनिस्सारण प्रकल्प तब्बदल 131  कोटी रुपये खर्चाचा होण्यासाठी 2017 मध्ये मंजुरी मिळाली होती. 2018 मध्ये कार्यारंभ आदेश मिळाले. त्यात राजकीय हस्तक्षेप झाला. दोन वेळा सुरू झालेले काम बंद पडले. जुलैै 2020 मध्ये हे काम पुर्ण करण्याची मुदत आहे. आता कोरोनाचं कारण सांगताहेत. कोरोनामुळं लाॅकडाऊन झालं. हे काम रखडलं. 

मी प्रदुषणमुक्त व्हावी, हीच माझी इच्छा आहे. त्यासाठी महापालिकेचा सांडपाणी व मलनिस्सारण प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा, असं मला मनोमन वाटतं. मी खूप शुद्ध होते हो, गर्भगिरीचं सुंदर व नितळ पाणी माझं लेणं आहे. ते पूर्वीप्रमाणे मला मिळेल का. वेड्या बाभुळीच्या काट्यांनी माझं अंग बेेढब झालंय. माझं मेकअप कोणी करेल काय. मला सुंदर दिसावं वाटतंय. कुणीतही मला मदत करेल काय. नगरकरांनो, तुम्हीच सांगा, मला पुन्हा माझं रुपडं देताल का.
(उत्तरार्ध)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com