आमदार निलेश लंके म्हणाले, ``पवार साहेबांशी इतका वेळ चर्चा करण्याची संधीच मिळाली नव्हती...``

तू माझ्यासोबत मुंबईला चल असे साहेबांनी मला सांगितले. आणि त्यांच्यासोबत विमानाने पवार साहेब मला घेऊन आले.
nilesh-lanke-sharad-pawar.jpg
nilesh-lanke-sharad-pawar.jpg

पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासबोत दिल्ली ते मुंबई असा विमानप्रवासाचा वेग पारनेरचे आमदार निलेश लंके यांना आज आला. या प्रवासातील तसेच दिल्ली दौऱ्यातील अनुभव लंके यांनी मांडले असून पवारसाहेबांसोबतचा दौऱ्याचा अनुभव त्यांनी कथन केला. `तू माझ्यासोबत मुंबईला चल, असे साहेबांनी मला सांगितले. आणि त्यांच्यासोबत विमानाने पवार साहेब मला घेऊन आले. दीड तासाच्या प्रवासामध्ये साहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाशी चर्चा करण्याची संधी मिळाली, असे लंके यांनी म्हटले आहे.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लंके म्हणतात, ``गेल्या दीड वर्षांपासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करीत आहे. साहेबांना या अगोदर अनेकदा भेटलो, मात्र त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी फारसा वेळ मिळाला नाही. भेटण्यासाठी येणाऱ्यांची मोठी संख्या, अनेक कामांमध्ये व्यस्तता असल्याने ते शक्य झाले नाही. मात्र हा योग जुळून आला तो शुक्रवार दिनांक 18 सप्टेंबर 2020 रोजी! पारनेरसह, राहुरी आणि नगर या तालुक्यांमध्ये के के रेंज विस्तारीकरणाकरीता जमीन संपादित करण्यात येऊ नये याकरता आमचा लढा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. पवार साहेब यांच्या कानावर हा विषय अगोदर घातला होता. त्यांनी  देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या कार्यालयात साहेबांनी फोन केला. मात्र संरक्षण मंत्री कार्यालयात नसल्याने बोलणे झाले नाही. परंतु काही वेळातच साहेबांना राजनाथसिंह साहेबांचा फोन आला आणि भेटीची वेळ ठरली. शुक्रवारी याबाबत चर्चा करण्यासाठी लष्करप्रमुख यांनाही बोलावण्यात आले.

हा प्रश्न स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला मांडण्याची संधी साहेबांनी दिली. माझे सर्व मुद्दे कसे योग्य आहेत, हे पवार साहेबांनी संरक्षण मंत्री तसेच लष्कराच्या अधिकाऱ्यांना पटवून दिले. याबाबत संरक्षण विभागाने त्वरित सकारात्मक निर्णय घेतला. त्यानंतर या ठिकाणाहून बाहेर आल्यानंतर तुम्ही कधी जाणार आहात असा प्रश्न पवार साहेबांनी मला विचारला. संध्याकाळी निघणार असल्याचे मी सांगितले. तू माझ्यासोबत मुंबईला चल असे साहेबांनी मला सांगितले. आणि त्यांच्यासोबत विमानाने पवार साहेब मला घेऊन आले. दीड तासाच्या प्रवासामध्ये साहेबांनी माझ्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली. विशेष करून संरक्षण खात्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव असल्याचे दिसून आले. ते संरक्षणमंत्री असताना युद्धबंदी करार कशा पद्धतीने करण्यात आला. त्यामध्ये कोण कोणत्या अटी आहेत. त्याचे उल्लंघन झाल्यानंतर काय परिणामांना सामोरे जावे लागेल. याबाबत पवार साहेबांनी मला सविस्तर माहिती दिली. भारत-चीन संबंध, त्यांनी केलेला चीनचा दौरा याविषयी साहेब भरभरून बोलले. संरक्षण खात्याची व्याप्ती किती मोठी आहे. याचा प्रत्यय मला त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आला. लहान लहान आणि तितक्याच महत्त्वाच्या बाबींची साहेबांकडून मला माहिती मिळाली. याशिवाय मराठा आरक्षणाबाबत सुद्धा पवार साहेबांनी एक आमदार म्हणून माझं मत विचारले. इतक्या मोठ्या उंचीच्या नेतृत्वाकडूनही माझ्यासारख्या नवीन आमदाराचे मत विचारात घेतले जाते. यावरून साहेबांचे उदार मत आणि मोठ्या मनाची उंची दिसून आली.

काही दिवसांपूर्वी साहेबांचा लहानपणाचा फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्याबाबतही साहेब भरभरून बोलले. हास्यविनोद करून विमानातील वातावरण अल्हाददायक केले. मध्येच आपले विमान कुठे आले आहे. आपण किती उंचावर आहे, त्याचबरोबर तापमान किती आहे. याबाबत ते मला माहिती देत होते. त्यांच्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्व बरोबर मला अशाप्रकारे विमान प्रवास करता येईल. हे मी स्वप्नातही पाहिले नव्हते, मात्र नियतीने आणि माझ्या पारनेर- नगर विधानसभा मतदारसंघातील जनतेमुळे हा योग आला. विविध विषयांवर चर्चा आणि गप्पा इतक्या रंगल्या होत्या की मुंबई विमानतळावर विमान कधी उतरले झाले हे समजलेच नाही. अत्यंत प्रेमळ, संवेदनशील असे व्यक्तिमत्व असलेल्या साहेबांनी अल्पावधीतच मला आपलेसे केले. मला काम करण्याची प्रेरणा त्यांच्याकडून मिळाली. त्यांच्यासोबत विमान प्रवास करीत असताना जो अनुभव आला त्यामुळे मला अधिकच बळ मिळाले आहे. समाजासाठी काम करण्याची एक प्रकारे अधिक पटीने उर्मी वाढली आहे. साहेब पाठीवर हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा! इतकच यानिमित्ताने मी सांगू शकेल!

-निलेश लंके

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com