`मेरे पास मेरा बाप है`! बिनविरोधची कामगिरी करून मंत्री गडाखांनी घेतले वडिलांचे आशिर्वाद - I have my father`! Minister Gadakh took the blessings of his father by performing unopposed | Politics Marathi News - Sarkarnama

`मेरे पास मेरा बाप है`! बिनविरोधची कामगिरी करून मंत्री गडाखांनी घेतले वडिलांचे आशिर्वाद

विनायक दरंदले
गुरुवार, 21 जानेवारी 2021

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी स्थापन केलेला मुळा कारखाना व एज्युकेशनचे रोपटे आज खुप मोठे झाले आहे. या दोन्ही संस्थेमुळे परिसर आणि तालुक्याचे अर्थकारण मोठ्या उंचीवर गेले आहे.

सोनई : ग्रामपंचायत निवडणुकीत संपूर्ण नेवासे तालुका भगवामय केल्यानंतर अशक्य वाटणारी मुळा कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी परिसरात 'साहेब ' नावाने प्रसिध्द असलेल्या आपल्या वडिलांच्या पायावर डोके ठेवून आशिर्वाद घेतला. 

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी स्थापन केलेला मुळा कारखाना व एज्युकेशनचे रोपटे आज खुप मोठे झाले आहे. या दोन्ही संस्थेमुळे परिसर आणि तालुक्याचे अर्थकारण मोठ्या उंचीवर गेले आहे. राज्यात प्रगतीपथावर असलेल्या पहिल्या आठ-दहा कारखान्यात 'मुळा'चे नाव आहे. या कारखान्यास उत्कृष्ट व्यवस्थापनेचा दोन वेळेस पुरस्कार मिळालेला आहे.

मंत्री गडाख यांनी सहा वर्षापूर्वी राष्ट्रवादीतून बाहेर पडत क्रांतीकारी पक्षाचा मुकूट डोक्यावर घेत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका लढल्या. या पहिल्याच प्रयत्नात त्यांना मोठे यश मिळाले होते. याच माध्यमातून त्यांनी हातातून गेलेली आमदारकी पुन्हा मिळविली. शिवसेनेला दिलेला पाठिंबा त्यांना कॅबिनेट  मंत्रीपद देवून गेला.

गेल्या निवडणुकांत प्रशांत पाटील गडाख यांनी एका भाषणात "मेरे पास मेरा बाप है" हा डायलॉग चांगलाच गाजला होता. वयोमानाने ज्येष्ठ नेते आज प्रचारात नाहीत. सहकाराच्या राजकारणातूनही ते निवृत झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता मंत्री शंकरराव गडाख यांनी वडिलांचे दर्शन घेतानाचा फोटो व्हायरल झाला आहे.

काैशल्य पणाला लावले 

'मुळा'कारखान्यासाठी १३८ अर्ज होते.सर्वाना वाटले निवडणूक होणार, मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मंत्री गडाख यांनी आपले कौशल्य पणाला लावून १३८ पैकी ११७ अर्ज मागे घेत निवडणूक बिनविरोध करुन दाखविली. यानंतर त्यांनी सर्वप्रथम 
वडील यशवंतराव यांच्या पायावर डोके ठेवून त्यांनी आशिर्वाद घेतला.  

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख