राणेंच्या बोलण्याची दखल घ्यायला माझ्याकडे वेळच नाही : तनपुरे यांचा टोला

साखर उद्योगाला मदतीच्या मुद्द्यावरून राणे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात सुरू झालेल्या "ट्विटर वॉर'मध्ये तनपुरे यांनी पुन्हा उडी घेतली.
rane and tanpure
rane and tanpure

नगर : कोरोनाच्या संकटात ते माझ्याबद्दल काय बोलले, याबाबत दखल घ्यायला मला वेळ नाही. राज्यात अनेक कामे पडली आहेत. त्यांच्यासारख्या लहान मुलांकडे दुर्लक्ष केलेले बरे, अशा शब्दांत नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी  माजी खासदार नीलेश राणे यांचा समाचार घेतला. 

जिल्हाधिकारी कार्यालयात आज खरीप हंगाम नियोजनाची बैठक झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री तनपुरे म्हणाले, ""नीलेश राणे यांनी उत्तर देताना सभ्य वापरायला हवी होती; पण ती त्यांच्यात दिसली नाही. एका माजी खासदाराला असे बोलणे त्यांना शोभत नाही. त्यामुळे त्यांना चांगलाच उपदेश दिला होता. कार्यकर्त्यांनाही सांगितले आहे, की लहान मुलाकडे दुर्लक्ष करा.'' 

साखर उद्योगाला मदतीच्या मुद्द्यावरून राणे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात सुरू झालेल्या "ट्विटर वॉर'मध्ये तनपुरे यांनी पुन्हा उडी घेतली. ""आमदार रोहित पवार यांच्याबद्दल बोलताना नीलेश राणे यांनी संकेत सोडले. त्यांच्या बोलण्यात सभ्य भाषा असेल असे वाटले होते; परंतु त्यांची शब्दपातळी चांगलीच घसरली. लहान मुलांना वाटते, की आपण अपशब्द बोलून काही तरी पराक्रम केला. त्यामुळे अशा लहान मुलांकडे दुर्लक्ष केलेलेच बरे,'' असा टोला मंत्री तनपुरे यांनी राणे यांना लगावला.

दरम्यान, तनपुरे यांनी नीलेश राणे यांना थेट इशारा देताना म्हटले होते, की पवार घराणे अत्यंत अभ्यासू, सुसंस्कृत आहे, म्हणूनच राष्ट्रवादीतील कार्यकर्ते त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात. "टप्प्यात आल्यावर राष्ट्रवादीवाले कार्यक्रम करतात,' हे तनपुरे यांचे वाक्‍य राणे यांना झोंबले होते. त्यातून ट्‌विटरवर हा वाद चांगलाच रंगला होता. 

महाविद्यालयांच्या अंतिम परीक्षांसंदर्भात बैठकीत चर्चा झाली. त्यात कोरोनाच्या परिस्थितीत काय सुधारणा होईल, तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य, त्यांच्या भविष्यातील करिअरचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असे तनपुरे म्हणाले. 

हेही वाचा...

उसाच्या पैशासाठी आंदोलनाचा इशारा 

श्रीरामपूर : शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे 15 जूनपर्यंत वर्ग न केल्यास 16 जूनला संगमनेर तालुक्‍यातील युटेक शुगर या कारखान्यावर शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे व जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख यांनी दिली. 

श्रीरामपूर, नेवासे, राहुरी तालुक्‍यातील हजारो शेतकऱ्यांनी पाच ते सहा महिन्यांपूर्वी युटेक शुगरला ऊस दिला. परंतु कारखाना प्रशासनाकडून अद्यापही उसाचे पेमेंट शेतकऱ्यांना करण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांनी पेमेंटसंदर्भात चौकशी केल्यास त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. ऊस देऊनही पेमेंट नसल्याने शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले आहेत. त्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. 

शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन "प्रहार'चे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे व जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख यांनी युटेकचे अध्यक्ष रवींद्र बिरोले यांच्याशी संपर्क साधून सर्व ऊसउत्पादकांचे पेमेंट तत्काळ जमा करावेत; अन्यथा लॉकडाउन असतानाही पेमेंटसाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. बिरोले यांनी 15 जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे पेमेंट संबंधितांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याचे सांगितले. 15 जूनपर्यंत युटेक शुगरने सर्व शेतकऱ्यांचे उसाचे पेमेंट जमा न केल्यास 16 जूनला राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा पोटे व शेख यांनी दिला.

बातम्यांचे अपडेट्स तातडीने मिळण्यासाठी 'सरकारनामा'चा ॲप डाऊनलोड करा.. सोबतची लिंक ओपण करा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com