नाईकवाडे असे बनले आदर्श ! कठिण परिस्थितीत हाताळली जामखेडची स्थिती - This is how Naikwade became an ideal! Jamkhed's condition handled in difficult conditions | Politics Marathi News - Sarkarnama

नाईकवाडे असे बनले आदर्श ! कठिण परिस्थितीत हाताळली जामखेडची स्थिती

वसंत सानप
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

महाराष्ट्रात महसूलविभागाने अनेक अधिकाऱ्यांना गाैरविले. नगर जिल्ह्यातीलही काही अधिकाऱ्यांचा गाैरव झाला. त्यामध्ये जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांचा आदर्श तहसीलदार म्हणून गाैरव करण्यात आला.

जामखेड : काही अधिकारी आपल्या उत्कृष्ठ कामांमुळे नागरिकांच्या कायम स्मरणात राहतात. प्रत्येक तालुक्यात गुंडगिरी, राजकारण, वाळुतस्करी हे प्रकार होतच असतात. परंतु संबंधित तहसीलदार तेथील परिस्थिती कशी हाताळतात, यावर सर्व काही अवलंबून असते. असाच आदर्श घालून दिला आहे जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी.

महाराष्ट्रात महसूलविभागाने अनेक अधिकाऱ्यांना गाैरविले. नगर जिल्ह्यातीलही काही अधिकाऱ्यांचा गाैरव झाला. त्यामध्ये जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांचा आदर्श तहसीलदार म्हणून गाैरव करण्यात आला.

नुकताच त्यांचा आदर्श तहसीलदार म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी नाईकवाडे यांचा गाैरव केला. त्यानिमित्ताने `सरकारनामा`शी बोलताना त्यांच्या कर्तृत्त्वाचे अनेक पैलू उलगडले. विशेषतः जामखेडला कोरोनामुक्तीकडे घेवून जाताना त्यांचे काम राज्यात एक वेगळा पॅटर्न ठरले.

कोरोनात कसे काम केले

गेल्या तीन महिण्यांपासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केलेले काम दीपस्तंभासारखे जामखेडकरांच्या स्मरणात राहील. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी दररोज टाकलेले पाऊल आणि घेतलेले निर्णय राज्यात लक्ष वेधी ठरले. राज्यात आगळेवेगळे प्रयोग जामखेडला राबविले म्हणूनच आजपर्यंत तालुक्याची स्थिती चांगली राहिली. 

जामखेड हाॅटस्पाॅट असताना केलेले कार्य, दिलेली मदत, दिलेली साथ आणि कोरोनावर केलेली मात, सदैव जामखेडकरांच्या स्मरणात राहिल. यानिमित्ताने काही प्रसंगी प्रशासन म्हणून तहसीलदार नाईकवाडे कठोर झाले, तर काही प्रसंगात भावनिक आणि दयाळू झाल्याचे पहायला मिळाले. अशा अधिकाऱ्यांमुळेच आज समाज किती सुरक्षित राहू शकतो, याची प्रचिती जामखेडकरांनी अनुभवली.

मुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या व्यक्तींना जामखेड व खर्डा येथे क्वारंटाईन करण्याचा घेतलेला निर्णय राज्याचे लक्ष वेधणारा ठरला. यासाठी दररोज हाजारोंचा खर्च प्रशासनाने उचलला. हे नियोजन कौतुकास्पद ठरले, मात्र खरोखरच या निर्णयामुळे ग्रामीण भागातील सुरक्षितता आजपर्यंत अबाधित राहिली. प्रत्येक जामखेडकर प्रशासनाचा ऋणी आहे, असेच काम करून दाखविले. त्यामुळे त्यांचा आदर्श तहसीलदार म्हणून झालेला गाैरव सार्थ ठरला आहे.

पाणीटंचाईवर मात

तहसीलदार म्हणून तीन वर्षापूर्वी विशाल नाईकवाडे जामखेडला हजर झाले. सातत्याने खडतर परिस्थितीवर मात करण्याचे आव्हाण त्यांनी पेलले. जामखेडचे तहसीलदार म्हणून जामखेड नगरपालिकेच्या अतिरिक्त कार्यकारी अधिकारी पदाचीही जबाबदारीही त्यांनी सांभाळली. दैनंदिन कामकाजाबरोबरच नैसर्गिक आपत्तीचा सामना कणखरपणे केला. पाणी टंचाईची गंभीर स्थिती त्यांनी चांगल्या पध्दतीने हातळली. मागेल त्या गावांना शासनाच्या नियम अटींना अधिन राहून टँकरचा पुरवठा करण्याचा प्रयत्न केला. चारा टंचाईच्या स्थितीवर मात करताना तालुक्यातील विविध भागात चारा छावण्या दिल्या. निर्माण झालेल्या गंभीर परिस्थिती मागेल त्याला हाताला काम आणि पोटाला दाम दिला. `रोहयो`, `मनरेगा`ची कामे मोठ्या कुशलतेने सर्व विभागाला बरोबर घेऊन  केले.

वाळू तस्कारांना आळा

शहरातील अतिक्रमणाचे संवेदनशील विषय मोठ्या खुबीने त्यांनी हाताळला. वाळू तस्करांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याविरुध्द निःपक्षपातीपणे कार्यवाही केली. दरवर्षी महसूल विभागाला विक्रमी वसूल करुन दिला. तालुका जिल्ह्यात आघाडीवर राहिला. कायदा सुव्यवस्था चोख राहील, याची काळजी घेतली. जामखेडच्या इतिहासात चांगले काम करणारे तालुका दंडाधिकारी म्हणून ओळख निर्माण केली. केवळ कागदावर, फलकावर नाही, तर येथील जनतेच्या मनावर, स्वतःचे स्थान निर्माण केले. म्हणूनच त्यांच्या कार्यबाहुल्याचा सन्मान जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केला. ही जामखेडकरिता गौरवाची आणि अभिमानाची बाब ठरली आहे.

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख