शिर्डी : कोविडसोबत लढताना अर्थव्यवस्थेला चालना द्यायची इच्छा आहे ना; मग फक्त एक शून्य वाढवा. त्यामुळे आम्हाला जगण्याची संधी मिळेल. ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, अशी मागणी जिल्ह्यातील मंगल कार्यालये, मंडप आणि फूल सजावटकारांनी केली. आमदार राधाकृष्ण विखे- पाटील यांना त्यांनी तसे साकडेच घातले.
आमच्या भावना महाराष्ट्रात इतर व्यावसायिकांना पटतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत मागणी करा. अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक फिरवायचे असेल, तर कसेही करून एक शून्य वाढवा. जाहीर कार्यक्रम व विवाह समारंभांतील संख्येची अट 50 वरून 500 करा. हे केल्याशिवाय ग्रामीण भागातील अर्थकारणास चालना मिळणे अशक्य आहे. आम्ही फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशनची काळजी घेऊ, असा शब्द व्यावसायिकांनी दिला.
राहाता तालुक्यात 50 हून अधिक लॉन, शंभराहून अधिक मंडपवाले आहेत. विवाह व अन्य समारंभांच्या उपस्थितीची अट 50 वरून 500 केली, तर फूल सजावटकार, फोटोग्राफर, बॅंड व डीजे, घोडा व पारंपरिक वाजंत्रीवाले, आचारी, वाढपी, सुरक्षारक्षक, अशा हजारो व्यक्तींना रोजगार मिळेल. त्यांचे व्यवसाय लगेच सुरू होतील. यातून अन्य व्यवसायांनाही चालना मिळू शकेल.
विवाह समारंभ व अन्य कार्यक्रमांसाठी 50 पेक्षा अधिक लोकांना एकत्रित येण्यास मनाई असल्याने शेकडो जणांचा रोजगार गेला. या कार्यक्रमांशी निगडित कलाकार व व्यावसायिक घरी बसले. तालुक्यात शंभराहून अधिक मंडपवाले व फूल सजावटकार आहेत. तीसहून अधिक बॅंड, डीजे व घोडेमालक आहेत. लॉन, मंगल कार्यालये ओस पडली. जिल्ह्यात एक लाखाहून अधिक कुटुंबांना त्याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष फटका बसत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगची काटेकोर अंमलबजावणी करून 500 लोकांना जाहीर कार्यक्रमासाठी एकत्र येण्यास परवानगी द्यावी, अशी व्यावसायिकांची मागणी आहे.
मंगल कार्यालये सर्व काळजी घेतील
प्रत्येकी दोन ते अडीच कोटी रुपये खर्चून राहाता तालुक्यात 30 ते 40 मंगल कार्यालये व लॉन्स सुरू झाले. लग्नसराईमुळेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते. तीन हजार लोकांची क्षमता असलेल्या मंगल कार्यालयांना 50 लोकांच्या समारंभाची परवानगी कशी परवडणार? फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझेशन व अन्य सर्व काळजी घेऊन 500 व्यक्तींच्या समारंभास परवानगी मिळाली, तर 20 ते 25 टक्के अर्थकारण फिरू शकेल, असे मत मंगल कार्यालयाचे संचालक दिलीप रोहोम यांनी मांडले.
विखे पाटलांनी पुढाकार घ्यावा
तालुक्यातील प्रत्येक गावात दोन ते तीन मंडपवाले आहेत. किमान 500 व्यक्तींच्या उपस्थितीत कार्यक्रमांना परवानगी दिल्याशिवाय काहीही साध्य होणार नाही. आमदार राधाकृष्ण विखे- पाटलांनी याबाबत पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले आहे, असे मत मंंडपवाले बाळासाहेब सोनटक्के यांनी व्यक्त केले.

