अशी कशी केली मतदार यादी ! शेवगाव नगरपरिषदेत हरकतींचा पाऊस - How did the voter list! Rain of objections in Shevgaon Municipal Council | Politics Marathi News - Sarkarnama

अशी कशी केली मतदार यादी ! शेवगाव नगरपरिषदेत हरकतींचा पाऊस

सचिन सातपुते
मंगळवार, 23 फेब्रुवारी 2021

सर्वाधिक 418 हरकती 1146 मतदारांवर प्रभाग 20 मध्ये घेण्यात आल्या असून, 2266 मतदार असलेल्या प्रभाग 16 मधील 1341 मतदारांच्या नावावर 94 जणांनी हरकती घेतल्या आहेत.

शेवगाव : शेवगाव नगरपरीषद निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर जाहीर केलेल्या प्रभाग निहाय मतदार यादयांवर हरकतींचा पाऊस पडला असून, शहरातील एकुण 21 प्रभागातील 14 हजार 586 मतदारांवर 1 हजार 905 जणांनी हरकती घेतल्या आहेत.

सर्वाधिक 418 हरकती 1146 मतदारांवर प्रभाग 20 मध्ये घेण्यात आल्या असून, 2266 मतदार असलेल्या प्रभाग 16 मधील 1341 मतदारांच्या नावावर 94 जणांनी हरकती घेतल्या आहेत. 

हेही वाचा... दुर्गा तांबे यांचा असाही छंद

शेवगाव नगरपरीषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, त्यादृष्टीने इच्छुक उमेदवारांनी आपल्या सोयीचे मतदार आपल्या प्रभागात असावेत, यासाठी त्यांची नावे इतर प्रभागातून कमी करुन आपल्या प्रभागात नोंदवली आहेत. त्यामुळे गेल्या दोन तीन महिन्यापासून शहरात मतदार यादयांचे काम करणा-या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदारांची नावे कमी करणे, समाविष्ट करणे, नवीन नोंदणी करणे, या कामांनी जेरीस आणले आहे.

प्रशासकीय पातळीवर राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार नगरपरीषद निवडणुकीसाठी मतदार यादयाचा कार्यक्रम 2 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार 15 फेब्रुवारीपर्यंत प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे, 15 ते 22 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द केलेल्या प्रारुप मतदार यादीवर हरकती व सुचना दाखल करणे, 1 मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे व 8 मार्च रोजी मतदान केंद्राची व केंद्र निहाय मतदारांची यादी प्रसिध्द करणे असा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 

हेही वाचा... जिल्हा बॅंक आमदारांसाठीच राखीव आहे का

शहरातील एकूण 21 प्रभागासाठीची प्रारुप मतदार यादी 15 फेब्रुवारी रोजी प्रसिध्द झाल्यानंतर शहरातील सर्व प्रभागात मतदार नोंदणी व प्रभाग रचना करतांना झालेला सावळा गोंधळ उघडकीस आला असून, हरकती घेण्याच्या 22 फेब्रुवारी या शेवटच्या दिवशी पर्यंत तब्बल 14 हजार 586 मतदारांवर 1 हजार 905 जणांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे प्रशासनासमोरील डोकेदुखी वाढली आहे. प्रभाग 7 मध्ये 2106 मतदारांच्या नावावर 79 जणांनी, प्रभाग 4 मध्ये 862 नावांवर 151 जणांनी आक्षेप घेतला आहे. दरम्यान, या प्रकाराची चर्चा महाराष्ट्रभर होत आहे.

प्रभाग निहाय आलेल्या हरकतींची संख्या व कंसात हरकत घेतलेली मतदार संख्या - प्रभाग - 1 - 5 (8), 2-51 (290), 3-81 (528), 4-151 (862), 5-89 (608), 6-60( 546), 7-79 (2106), 8-65 (353), 9-26 (324), 10- 138 (542), 11- 169 ( 767), 12 - 98 ( 377), 13-46 (248), 14 - 57 ( 412), 15-32 (151), 16-94 (3325 - रिपीट 1984), 17-30 (501), 18- 58 (651), 19-104 (192), 20-418- (1146), 21- 54 (659). 
 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख