नगर : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आल्याने खान्देशात पक्षाला बळ मिळेल. भाजपमध्ये खडसे यांनी एवढा अन्याय सहन कसा केला, याचे आश्चर्य वाटते. त्यांचा राष्ट्रवादीत सन्मान होईल, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर मुश्रीफ पत्रकारांशी बोलत होते. मागील 11 महिन्यांपासून भाजपकडून राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे; पण ते शक्य नाही, असे सांगून मुश्रीफ म्हणाले, की विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाईची मागणी केली आहे. मात्र, पाच वर्षे सत्तेत असताना, त्यांनी एकदाही सरसकट भरपाई दिली नाही. कोल्हापूर जिल्ह्यात पूर आला असताना, हे "जनाधार' शोधत होते. त्यामुळेच कोल्हापूरच्या बाराही मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. प्रदेशाध्यक्षांना कोल्हापूर सोडून पुण्यात जावे लागले. भाजप नेते सत्तेत वेगळी कृती करतात व सत्ता गेल्यावर वेगळे बोलतात.''
पिचड यांना काय कमी दिले?
पिचड यांनीही पक्ष सोडताना अन्याय झाल्याची भावना व्यक्त केल्याबाबत विचारले असता, मुश्रीफ म्हणाले, ""माजी मंत्री मधुकर पिचड यांना पक्षाने काय कमी दिले? त्यांना पक्षाने भरभरून दिले होते. आता राष्ट्रवादीत येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. खडसे हे तर "अभी झॉंकी' आहेत. मात्र, मेरीटवर बाकीच्यांना पक्षात घेऊ. अनेकांना पुन्हा पक्षात यायचे आहे. मात्र, लोकांना तपासूनच पक्षात घेऊ.''

