असं कसं घडलं ! किंगमेकर कर्डिले यांच्या आमदारकीला ब्रेक कोणी लावला - How did that happen! Who put a brake on Kingmaker Cordile's legislature? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

असं कसं घडलं ! किंगमेकर कर्डिले यांच्या आमदारकीला ब्रेक कोणी लावला

मुरलीधर कराळे
शनिवार, 24 ऑक्टोबर 2020

मागील वर्षी म्हणजे 24 आॅक्टोबर 2019 रोजीचा सूर्य शिवाजी कर्डिले यांना मावळतीचे रंग दाखविण्यासाठीच उगवला. तब्बल 25 वर्षे आमदारकीची सवय लागलेल्या बुऱ्हाणनगरकरांना असे होईल, हे वाटलेच नव्हते.

नगर : दुधवाला शिवाजी आमदार झाला, तेव्हा इतिहास घडला होता. नगर तालुक्यातील पूर्व भागातून सूर्य अधिक तेजस्वी उगवला होता. नंतर मात्र तब्बल 25 वर्षे आमदारकी मिरविलेल्या भाजपचे दिग्गज नेते शिवाजी कर्डिले यांच्या आमदारकीला खो बसला. मागील वर्षी राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी त्यांना धोबीपछाड केले. असं कसं घडलं, आमदारकीला ब्रेक कसा बसला, या प्रश्नाचे उत्तर शोधत जुने जाणते कार्यकर्ते मात्र डोके खाजवीत बसले.

मागील वर्षी म्हणजे 24 आॅक्टोबर 2019 रोजीचा सूर्य शिवाजी कर्डिले यांना मावळतीचे रंग दाखविण्यासाठीच उगवला. तब्बल 25 वर्षे आमदारकीची सवय लागलेल्या बुऱ्हाणनगरकरांना असे होईल, हे वाटलेच नव्हते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतील राहुरी विधानसभा मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले होते. त्याला कारणही तसेच होते. जिल्ह्याच्या राजकारणात कायम महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कर्डिले यांच्यासमोर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार तनपुरे यांनी कडवे आव्हान उभे केले होते.

सकाळी मतमोजणी सुरू झाली, तेव्हा पहिल्याच फेरीत तनपुरे यांनी 4 हजार 500 मतांनी आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीत तनपुरे आघाडीवरच राहिले. परंतु घाटावची मतमोजणी सुरू झाल्यावर कर्डिले नक्कीच पुढे जातील, असा कर्डिले समर्थकांचा व्होरा होता. तथापि, आठव्या फेरीतही तनपुरे यांनी तब्बल 26 हजार 296 मतांनी आघाडी घेतली. त्या वेळी मात्र आता आपले काही खरे नाही, असे कर्डिले यांच्या गोटातून चर्चा सुरू झाली. अखेर झाले तसेच.

दहाव्या फेरीत निर्णायक मताधिक्य मिळाल्याने प्राजक्त तनपुरे यांचा विजय निश्चित झाला. कारण मोठे लीड तोडणे कर्डिले यांना शक्यच होणार नाही, हे स्पष्ट झाले होते. तनपुरे यांना 98 हजार 572 मते मिळवत बाजी मारली, तर कर्डिले यांना 62 हजार 710 मतांवर समाधान मानावे लागले. प्राजक्त यांनी वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. तनपुरे यांच्या कुटुंबियाकडे पुन्हा आमदारकी आली. इकडे कर्डिले यांचा 25 वर्षाच गड कोसळला.

राहुरीत धमाके अन बुऱ्हाणनगर चिडीचूप

निकालानंतर राहुरीमध्ये दिवाळीच साजरी झाली. तनपुरे यांनी मिळविलेल्या यशाने राहुरी शहरात आतिषबाजी झाली. तनपुरे यांच्या घरावर पुन्हा विजयाचे तोरण चढविले गेले. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या भाच्यांनी इतिहास घडविला. इकडे बुऱ्हाणनगरमध्ये मात्र कर्डिले यांच्या घरावरील पताका गळाल्या. गाव शांत झाले. रस्ते गुलालाने माखतील, अशी शक्यता धुळीस मिळाली. गर्भगिरी डोंगररांगेतील, घाटाच्या वरची गावे कोमेजली. आपले साहेब पडले, हे ऐकून काहींनी बंगल्याकडे धाव घेतली. एकगठ्ठा पडत असलेल्या मतात कुठेतरी फूट पडल्याचे दिसून आले. आपल्याच कार्यकर्त्यांनी धोका दिल्याची चर्चा सुरू झाली. 

जयंत पाटील यांच्या भाच्याने इतिहास घडविला

कर्डिले यांनी यापूर्वी दोन वेळा राहुरी विधानसभा मतदारसंघातून विजयश्री मिळविली होती. 2009 मध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून उभे असलेले प्रसाद तनपुरे यांचा कर्डिले यांनी पराभव केला होता. स्वाभिमानी पक्षाकडून शिवाजी गाडे, अपक्ष सुभाष पाटील हेही उमेदवार त्या वेळी रिंगणात होते. साहजिकच मतविभागणी होऊन तनपुरे यांना पराभव स्विकारावा लागला.  त्यानंतर 2014 मध्ये तनपुरे यांच्या पत्नी डाॅ. उषा तनपुरे या शिवसेनेकडून उभ्या होत्या. त्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या भगिनी होत. डाॅ. तनपुरे यांनाही कर्डिले यांच्याकडून पराभवाचा दणका बसला. या वेळीही मतविभागणीचा फायदा कर्डिले यांना झाला. तनपुरे यांचे पुत्र प्राजक्त यांनी मात्र आई - वडिलांना जमले नाही, ते करून दाखविले. दोघांच्याही पराभवाचा वचपा काढत कर्डिले यांना धोबीपछाड केले. मागील दोन्ही निवडणुकीत झालेली चूक सुधारली. दुरंगी लढत होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. मतविभागणी टाळली आणि विजयश्री खेचून आणली.

टोपी फिरलीच कशी नाही

`टोपी फिरविली की राजकारण फिरते` असे शिवाजी कर्डिले यांच्याबाबतीत म्हटले जाते. जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाच्या टप्प्यात कर्डिले यांचे शस्त्र निर्णायक ठरले. असे असताना कर्डिले यांचा पराभव कसा झाला, याचेच आश्चर्य राज्यातील धुरिणांनी व्यक्त केले. अनेकांना प्रश्न पडला, तेल लावलेला पैलवान पडला कसा, कर्डिले साहेबांची `टोपी` या वेळी कशी नाही फिरली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख