पाथर्डी : कासार पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमदार मोनिका राजळे यांच्या जाऊबाई सरपंच मोनाली राजळे, वसंत भगत, आर. वाय. म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली पॅनल निवडणूक लढवित आहे. अर्जुन राजळे, संदीप राजळे, महादेव शेळके, गोरक्ष राजळे, सुनिल राजळे, अंकुश माळी, सुरेश तिजोरे यांनी सत्ताधारी पॅनलपुढे कडवे आवाहन उभे केले आहे. त्यामुळे कासार पिंपळगाव येथे राजळे यांच्या घरातच सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. मोनाली राजळे यांनी पाच वर्षे सरपंचपद यशस्वीपणे सांभाळून विकासाची कामे केली आहेत. त्यामुळे निवडणूक सोपी असल्याचा दावा करीत विजय आमचाच असल्याचे राजळे गटाकडुन बोलले जाते.
पोलिस निरीक्षक रणजीत डेरे यांनी गावात शांतता रहावी, म्हणून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अवाहन केले आहे. कासारपिपंळगाव हे आमदार मोनिका राजळे यांचे गाव आहे. त्यांच्या जाऊबाई मोनाली राजळे तेथील सरपंच आहेत. गावात विकासाची कामे केल्याने निवडणूक ही विकासाच्या मुद्यावर लढविण्यात येणार असल्याचे राजळे गटाकडून सांगितले जाते. गावातून जवखेडेकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन गेले, की गावाचा विकास किती झाला, हे ध्यानात येते, असा विरोधकांचा प्रश्न आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी गटाकडुन दबावाचे राजकारण केले जाते, असा आरोप विरोधी गटाकडुन होत आहे. गेल्या निवडणुकीत राजळे विरोधी गटाकडून गणेश भगत हे एकमेव उमेदवार निवडणुकीत विजयी झाले होते. तीन उमेदवार दहा ते पंधरा मतांच्या फरकाने पराभूत झाले होते. या वेळी ग्रामपंचायतीचा पंचवीस वर्षाचा अनुभव असणारे आदिनाथ नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष अर्जुन राजळे हे विरोधी गटाते नेतृत्व करीत आहेत. दरम्यान, या ग्रामपंचायतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागणार आहे.
विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक
विकासाच्या मुद्यावर व गावात शांतता नांदावी, यासाठी ग्रामपंचायत निवडणूक महत्वाची आहे. विकास करुन जनतेसमोर मते मागायला जाताना काहीच गैर नाही. विरोधाकडे कोणताही ठोस मुद्दा नाही. सर्वांना बरोबर घेवुन निवडणुकीला सामोरे जात अहोत, असे मत सरपंच मोनाली राजळे यांनी व्यक्त केले.
पारदर्शक कामासाठी निवडणूक
प्रत्येकाला सन्मानाची वागणूक मिळावी. गावाच्या विकासात सामान्य माणसाला सहभागी होता यावे व पारदर्शक कामासाठी आम्ही निवडणूक लढवीत अहोत. कोणताही आरोप करण्यापेक्षा आम्ही जनहिताचे निर्णय घेऊन लहान-थोर माणसाला सन्मान देवू. दबावाचे राजकारण जनता झुगारुन देईल, असे मत कासार पिंपळगाव येथील दुसऱ्या गटाचे नेते अर्जुन राजळे यांनी व्यक्त केले.
Edited By - Murlidhar karale

