राळेगणसिद्धी : "केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांचे पत्र घेऊन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आले होते. त्यांच्याशी चर्चा झाली असली, तरी मी उपोषणावर ठाम आहे. त्यात काही बदल होणार नाही,'' असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले.
स्वामिनाथन आयोगानुसार शेतमालाला हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता मिळावी, यांसह विविध मागण्यांसाठी हजारे यांनी 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथेच उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी फडणवीस यांनी येथे येऊन हजारे यांच्याशी तासभर चर्चा केली. आमदार गिरीश महाजन, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार बाबूराव पाचर्णे उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ""केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांचा निरोप घेऊन आपण हजारे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी उपस्थित केलेल्या नऊ मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. प्रश्न समजून घेतले. अण्णांच्या काही पत्रांना केंद्राकडून उत्तर आले होते; परंतु अण्णांना थातुरमातूर उत्तर देणे योग्य नाही. काही बाबी धोरणात्मक असल्याने अण्णांची भूमिका मी समजून घेतली. केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांच्याकडे ती मांडणार आहे. अण्णांनी मांडलेले शेतकऱ्यांचे प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत. कृषिमंत्री तोमर हे अण्णांच्या पत्रांना सकारात्मक व ठोस उत्तर देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.''
हजारे यांच्या राळेगणसिद्धीतील मागील उपोषणाच्या वेळी आपण लोकायुक्त कायद्यासाठी मसुदा समितीच्या स्थापनेला मंजुरी दिली होती. त्यानंतर राज्य सरकार बदलले. सध्याचे सरकार लोकायुक्त कायद्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे समजल्याचे फडणवीस म्हणाले.
अण्णांवर उपोषणाची वेळ येणार नाही
अण्णा हजारे यांचे मन वळविण्यात अपयश आले का, या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, ""ही फक्त सुरवात आहे. अण्णा हे समाज व महाराष्ट्राचे भूषण आहेत. त्यांनी उपोषण करावे, ही राज्यातील व देशातील कोणाचीही इच्छा नाही. त्यांच्यावर उपोषणाची वेळ येणार नाही, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.''
Edited By - Murlidhar Karale

