hotspot zendigate in nagar | Sarkarnama

झेंडी गेट "हॉट स्पॉट' : जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी एकच रस्ता

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 13 मे 2020

झेंडी गेट परिसरात दोन दिवसांत कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्याने, हा परिसर मध्यरात्रीपासून "हॉट स्पॉट' करण्यात आला. या परिसरातील नागरिकांना उद्या (गुरुवारी) सकाळपासून महापालिका प्रशासन जीवनावश्‍यक वस्तू पुरविणार आहे.

नगर : शहरातील झेंडी गेट परिसरात दोन दिवसांत कोरोनाचे पाच रुग्ण आढळल्याने, हा परिसर मध्यरात्रीपासून "हॉट स्पॉट' करण्यात आला. या परिसरातील नागरिकांना उद्या (गुरुवारी) सकाळपासून महापालिका प्रशासन जीवनावश्‍यक वस्तू पुरविणार आहे. मुकुंदनगर "हॉट स्पॉट'मधून बाहेर येऊन 19 दिवस झाल्यानंतर झेंडी गेट परिसर "हॉट स्पॉट' झाला आहे. 
या परिसरातील सुभेदार गल्लीत मंगळवारी (ता. 12) एक महिला कोरोनाबाधित आढळली होती. त्यानंतर महापालिकेने परिसरातील नागरिकांचे घशातील स्राव तपासणीसाठी पाठविले होते. त्यांतील काही अहवाल आज प्राप्त झाले. यात आणखी चार जण कोरोनाबाधित असल्याचे आढळले. काल (मंगळवार) दुपारपासून हा परिसर "सील' आहे. आजचे अहवाल प्राप्त होताच रात्री साडेआठच्या सुमारास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी झेंडी गेट परिसराची पाहणी केली. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार, शहर अभियंता सुरेश इथापे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हा परिसर "हॉट स्पॉट' म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतला. 
झेंडी गेट परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय, बीएसएनएल कार्यालय, मुख्य टपाल कार्यालय आदी शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयांत जाण्यासाठी केवळ एक रस्ता खुला ठेवून उर्वरित भाग "हॉट स्पॉट' जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी महापालिकेकडून करण्यात येणार आहे. परिसरातील कोणतेही दुकान उघडता येणार नाही. येथे मुस्लिमांची संख्या अधिक आहे. रमजान महिना सुरू असला, तरी नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. कोणतीही वस्तू महापालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच खरेदी करावी लागणार आहे. 

शहरातील नागरिकांचा मुक्‍त वावर होणार कमी 
शहर कोरोनामुक्‍त झाल्याचे समजून सर्व नागरिक खरेदीसाठी विविध दुकानांत जाऊ लागले होते. शहरातील मुख्य बाजारपेठ सोडून उर्वरित सर्व दुकाने खुली होऊ लागली होती. अशातच शहरात सहा रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासन पुन्हा लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख