The hot spot will be in the premises of the city collector's office | Sarkarnama

कोरोना रुग्ण सापडल्याने नगर जिल्हाधिकारी कार्यालय परिसर सील

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 12 मे 2020

जिल्हाधिकारी कार्यालय ते बीएसएनएल कार्यालय ते अशोका हॉटेल परिसर "सील' केला आहे. हा परिसर "हॉट स्पॉट' जाहीर करून "सील' करणार का? येथे कोणत्या सुविधा द्यायच्या, याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांच्यात चर्चा झाली.

नगर : जिल्हाधिकारी कार्यालयामागील झेंडी गेट परिसरातील सुभेदार गल्लीतील 70 वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्यामुळे महापालिका व पोलिसांनी सुभेदार गल्ली "सील' केली आहे. मात्र, याच परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय, बीएसएनएल कार्यालय, टपाल कार्यालय, बूथ हॉस्पिटल असल्याने, हा संपूर्ण परिसर "हॉट स्पॉट' होणार का, याकडे लक्ष लागले आहे. याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी काय निर्णय घेणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नव्हता. शहरातील 70 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 55 झाली आहे. या महिलेमध्ये "सारी'सदृश लक्षणे आढळल्याने दोन दिवसांपूर्वी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तसेच तिच्या घशातील स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज (मंगळवारी) सकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही महिला कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. तिच्या संपर्कात आलेल्या 42 जणांना प्रशासनाने विलगीकरण कक्षात ठेवले आहे. त्यांतील अनेकांचे स्राव-नमुने तपासणीसाठी पाठविल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. 

महापालिका व पोलिस अधिकाऱ्यांनी आज सकाळी या परिसराची पाहणी केली. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, महापालिकेचे शहर अभियंता सुरेश इथापे आदींसह महापालिकेचे व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. 

नगर शहरातील "हॉट स्पॉट' 
महापालिकेने अशोक हॉटेल ते रामचंद्र खुंट, रामचंद्र खुंट ते नालबंद खुंट ते डावरे गल्ली ते जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय ते बीएसएनएल कार्यालय ते अशोका हॉटेल परिसर "सील' केला आहे. हा परिसर "हॉट स्पॉट' जाहीर करून "सील' करणार का? येथे कोणत्या सुविधा द्यायच्या, याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांच्यात चर्चा झाली. "हॉट स्पॉट'बाबत काहीही निर्णय झाला नाही. हा परिसर "हॉट स्पॉट' झाल्यास जिल्हा प्रशासनाच्या कामात मर्यादा येणार आहेत. 

"सारी'चे 50 रुग्ण 
जिल्ह्यात 50 जणांना "सारी'ची लागण झाली आहे. महापालिका, नगरपालिका हद्दीत 23 आणि ग्रामीण भागात 27 रुग्ण आढळून आले आहेत. या सर्वांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली आहे. कोरोनाबरोबरच सारीचे रुग्ण सापडू लागल्याने आरोग्य विभाग आणखी सतर्क झाला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख