मधाचं पोळं अन घोंगावणाऱ्या मधमाशा ! विजय औटी यांचा टोला कोणाला - Honeycombs and beehives! Tola of Vijay Auti | Politics Marathi News - Sarkarnama

मधाचं पोळं अन घोंगावणाऱ्या मधमाशा ! विजय औटी यांचा टोला कोणाला

मुरलीधर कराळे
सोमवार, 6 जुलै 2020

पारनेर नगर पंचायतीचे पाच नगरसेवकांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. राज्यात दोन्ही पक्षाचे सरकार असल्याने हा प्रवेश शिवसेनेच्या जिव्हारी लागला. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या नेत्यांमध्ये जोरदार चर्चा झाली.

नगर : ``मधाच्या पोळ्यात जोपर्य़ंत मध आहे, तोपर्यंत माशा घोंगावतात, राजकारणात असंच असतं. ज्यांना स्वतःवर आत्मविश्वास नाही, अशी मंडळी इकडून तिकडे उड्या मारत राहतात. ते नगरसेवक सोडून गेले म्हणून पारनेर तालुक्यात शिवसेनेला काहीच फरक पडणार नाही,`` अशी प्रतिक्रिया विधानसभेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे नेते विजय औटी यांनी `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केली.

पारनेर नगर पंचायतीचे पाच नगरसेवकांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. राज्यात दोन्ही पक्षाचे सरकार असल्याने हा प्रवेश शिवसेनेच्या जिव्हारी लागला. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या नेत्यांमध्ये जोरदार चर्चा झाली. सत्तेत एकत्र असताना असे एकमेकांचे कार्यकर्ते फोडणार असेल, तर विरोधी भाजप शिरजोर होईल, त्यामुळे ही पद्धती योग्य नसल्याच्या प्रतिक्रियाही राज्यभर उमटू लागल्या. त्या पार्श्वभूमीवर औटी यांनी राष्ट्रवादीलाही कोरडे ओढले. तसेच शिवसेनेतून गेलेल्या कार्यकर्त्यांमुळे त्यांनी चिडून न जाता गेले ते कच्चे कार्यकर्ते होते, असेच सांगून त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र राष्ट्रवादीच्या या नितीबाबत नाराजीही व्यक्त केली.

औटी म्हणाले, की शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता आपल्या पक्षाशी ठाम असतो. ज्यांचा स्वतःवरच आत्मविश्वास नसतो, असे कार्यकर्ते पळून जातात. त्या कार्यकर्त्यांचा पक्षाला काहीच फायदा होत नाही. गेलेल्या पाचपैकी चार नगरसेवक शिवसेनेचे होते. एक अपक्ष होता. आता पळून काय साध्य होणार नाही. अजून पारनेर नगरपंचायतीचे आरक्षण निघायचे आहे. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. पळून गेलेल्यांपैकी अनेकांचे कार्यकर्ते मला भेटून गेले. ते गेले म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले. त्यामुळे या पाचजणांच्या जाण्याने पक्षाचे खूप काही नुकसान होईल, असे ऩाही. 

राष्ट्रवादीचे हे वर्तन योग्य नाही

राज्यात एकत्रित काम करीत असताना कार्यकर्ते फोडण्याची वृत्ती चांगली नाही. प्रत्येक पक्षाचे काही संकेत असतात. शिवसेना शिस्त पाळणारा पक्ष आहे. इतरांविषयी काही बोलणे योग्य नाही. शिवसेनेचे वरिष्ठ नेतेच याबाबत बोलू शकतील. पक्ष वाढविण्यासाठी राष्ट्रवादीची ही कृती योग्य नसल्याचे औटी यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख