हनी ट्रॅप ! हे तर कळायलाच हवं, "मामी'चा "हनी' अन्‌ "मास्टरमाइंड'चा "ट्रॅप'

या प्रकरणात कोणत्या "मामी'चा "हनी' अन्‌ कुठल्या "मास्टरमाइंड'चा "ट्रॅप', हे जनतेला कळायला हवे. स्थानिक पोलिसांच्या मर्यादा विचारात घेता, ही चौकशी उच्चस्तरीय व्हायला हवी.
hunny trap2
hunny trap2

नगर : राज्यात गाजत असलेल्या "सकाळ'च्या "हनी ट्रॅप' या वृत्तमालिकेतील पडद्यामागच्या खऱ्या चेहऱ्यांचा बुरखा बाजूला सारला गेला पाहिजे. प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढून धनिकांना गंडा घालणाऱ्या अशा टोळ्यांचा नेमका दिग्दर्शक कोण आणि त्यातील खरे व्हिलन कोण, हे चौकशीत पुढे येईल. या प्रकरणात कोणत्या "मामी'चा "हनी' अन्‌ कुठल्या "मास्टरमाइंड'चा "ट्रॅप', हे जनतेला कळायला हवे. स्थानिक पोलिसांच्या मर्यादा विचारात घेता, ही चौकशी उच्चस्तरीय व्हायला हवी, अशी मागणी माजी आमदार व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते राहुल जगताप यांनी केली.

माजी आमदार जगताप देणार मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह संबंधितांना आपण या संदर्भात निवेदन देणार असल्याचे सांगून जगताप म्हणाले, ""समाजविघातक कृत्ये करणाऱ्या "हनी ट्रॅप' टोळीचा हा विषय राज्यभर नव्हे, तर जगभर गाजला. सकाळ, सरकारनामा, ई-सकाळ या "सकाळ'च्या प्लॅटफॉर्मद्वारे तो जोरात प्रसिद्ध झाला. सकाळ माध्यम समूहाने व विशेषतः नगर आवृत्तीच्या टीमने, या टोळीत गुंतलेल्या गुन्हेगारांची पाळेमुळे किती खोल आहेत, हे माहिती असूनही अत्यंत धाडसाने हा नाजूक विषय समोर आणला. याबद्दल "सकाळ'चे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. "सकाळ'च्या या निर्भीड पत्रकारितेला आमचा सलाम. 

`त्या` आश्रयदात्यांचाही व्हावा पंचनामा

प्रेमाचे चाळे करून त्यातून ब्लॅकमेलिंगचे जाळे फेकणाऱ्यांची अदाकारी ठरावीक लोकांनी पाहिली आहे. हे बुरखेधारी चेहरे आता जनतेसमोर आणण्यासाठी सरकारने अत्यंत गांभीर्याने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करायला हवी, असे जगताप यांनी स्पष्ट केले. श्रीगोंदे तालुक्‍यात काही वर्षांपूर्वी, स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून राज्यातील श्रीमंत लोकांना गंडा घालण्याचे सत्र सुरू होते. या सगळ्या प्रकाराला आरोपी व पोलिसांच्या भाषेत "ड्रॉप' संबोधले जाते. आता त्याचा पुढचा अंक "हनी ट्रॅप' आहे. तेथे स्वस्तात सोने देण्याचे आमिष होते, येथे प्रेमाचे चाळे दाखवून जाळे टाकले जात आहे. दोन्हीकडेही पैशांची लूट आणि इज्जतीचा पंचनामा होत असल्याने, कोणीही पोलिसांपर्यंत जाण्यास धजावत नाही. स्वस्त सोन्याच्या लुटीत जसे राजकीय आश्रयदाते होते, तसे या "हनी ट्रॅप'लाही राजकीय वरदहस्ताची किनार असल्याचे जाणवते. या आश्रयदात्यांचाही पंचनामा व्हायला हवा, असे जगताप यांनी सांगितले.

"त्या' पोलिसांनी केली खात्याशी गद्दारी!

"हनी ट्रॅप'मध्ये राजकीय, सामाजिक, व्यावसायिक अशा विविध क्षेत्रांतील मंडळींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, नंतर ब्लॅकमेल करून लुटले जात असल्याचे "सकाळ'मधील बातम्यांवरून स्पष्ट दिसते. या टोळीतील सूत्रधारांची नावे बातमीत येत नसली, तरी ही मंडळी कोण आहेत, याचा अंदाज "सकाळ'च्या वाचकांना येऊ लागला आहे. आता चौकशीच सुरू झाल्याने ही नावे प्रत्यक्ष समोर येण्याची अपेक्षा आहे. "हनी ट्रॅप'मध्ये काही पोलिस अधिकारी व कर्मचारी आपल्या खात्याशी गद्दारी करीत सामील झाले. त्यांनीही लाखो रुपयांची माया लाटली. ही नावे जेव्हा पुढे येतील, तेव्हा स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना चौकशीला मर्यादा येतील. त्यामुळे सत्यशोधन होणारच नाही. त्यामुळेच ही चौकशी उच्चस्तरीय व्हायला हवी, असे जगताप यांनी "सकाळ'ला सांगितले.

"या' प्रवृत्ती नष्ट व्हायला हव्यात ः मनीषा सोनमाळी

सकाळ माध्यम समूहाने "हनी ट्रॅप'चा पर्दाफाश केला. हा विषय जेव्हा समोर आला, तेव्हा खेद वाटला. समाजात काही प्रवृत्ती अशा पद्धतीने काम करतात, हे पहिल्यांदाच समोर आले. घडलेला प्रकार निंदनीय आणि चुकीचा आहे. याला कुठे तरी आळा बसला पाहिजे, अशी भूमिका सावता परिषदेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष मनीषा सोनमाळी यांनी व्यक्त केली.

"सकाळ'मध्ये "हनी ट्रॅप' प्रकरण वाचल्यावर, हा प्रकार समाजविघातक आणि विध्वंसक असल्याचे प्रकर्षाने जाणवले. अशा प्रकारांमध्ये खऱ्या अर्थाने ज्या महिलांचे शोषण होते, तो प्रकार उजेडात येऊ शकणार नाही किंवा त्याच्यावर कोणाचा विश्वास राहणार नाही. त्यामुळे सामाजिक समतोल बिघडेल. पोलिसांनी सुरू केलेली चौकशी निश्‍चितच स्वागतार्ह आहे. यात जे दोषी असतील, त्यांना कठोर शासन झाले पाहिजे. ठरावीक मंडळी गटाने एकत्र येतात, एखाद्या व्यक्तीला जाळ्यात ओढून तिचे शोषण करतात आणि त्यातून वारेमाप पैसा कमावण्याचा प्रकार घडतो. अशा अपप्रवृत्ती नष्ट व्हायला हव्यात. त्यासाठी सामाजिक संस्थांनीही पुढाकार घ्यायला हवा, असे सोनमाळी म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com