Honey Trap! She robbed many merchants | Sarkarnama

हनी ट्रॅप ! अशी `मामी`ची आदा, व्यापारी फिदा अन कोट्यवधींचा `पाऊस`

डाॅ. बाळ ज. बोठे पाटील
बुधवार, 27 मे 2020

एका व्यापाऱ्याला "मामी'ने आपल्या हातचलाखीची "करामत' दाखवीत तब्बल दोन कोटींना लीलया लुटल्याची माहिती पुढे आली आहे. दुःखद बाब अशी, की संबंधित व्यापाऱ्याने, "माझ्या पत्नीचे कॅन्सरचे ऑपरेशन आहे, त्यासाठी काही तरी पैसे द्या,' अशी विनवणी करूनही "मामी' टोळीने त्याला दाद दिली नाही. 

नगर : बहुचर्चित "हनी ट्रॅप' प्रकरणात "महत्त्वा'ची भूमिका बजावत असलेली "मामी' "पैशांचा पाऊस' पाडण्यात परराज्यांतही प्रसिद्ध आहे. मोहजालात फसवून धनिक व अधिकाऱ्यांची लाखोंची लूट करण्याबरोबरच "मामी'चा पैशांचा पाऊस पाडणे, गंडादोरा करून "सुखशांती' मिळवून देणे, काळी जादू करीत कोणत्याही "उद्योगा'त यश मिळवून देणे, अशा "उपक्रमां'मध्ये "मामी' माहिर मानली जाते. नगर जिल्ह्यासह राज्यातील व परराज्यांतील हजारांहून अधिक जण "मामी'ची "अदा' व "मोहजाला'ला बळी पडल्याची माहिती हाती आली आहे. 

विशेष म्हणजे, एका व्यापाऱ्याला "मामी'ने आपल्या हातचलाखीची "करामत' दाखवीत तब्बल दोन कोटींना लीलया लुटल्याची माहिती पुढे आली आहे. दुःखद बाब अशी, की संबंधित व्यापाऱ्याने, "माझ्या पत्नीचे कॅन्सरचे ऑपरेशन आहे, त्यासाठी काही तरी पैसे द्या,' अशी विनवणी करूनही "मामी' टोळीने त्याला दाद दिली नाही. 

देव्हाऱ्याचा `चमत्कार`

नगर शहरातील एका उपनगरातील "एकनाथांच्या नगरी'तील "मामी'च्या घरातच "देव्हारा' आहे. कौटुंबिक व आर्थिक स्थैर्यासाठी देव्हाऱ्याची पूजा करण्यासाठी ती नेहमी अडचणीतील बड्या व्यक्तींना पाचारण करीत असते. पूजा व दर्शन झाले, की "मामी' संबंधितांना आणखी काही पूजा करण्यास सांगते. समस्यांनी ग्रासलेला माणूस तातडीने "मामी'च्या "करामती'ला भुलतो. त्याला पूजेची फी काही लाखांत सांगितली जाते. व्यापारवृद्धी अथवा नोकरीतील स्थैर्य व आर्थिक लाभासाठी तो सहज तयार होतो. त्यानंतर "मामी'चे "कवित्व' सुरू होते. एकामागून एक "उपचार' ती सांगत जाते. संबंधित व्यक्ती "मामी'च्या मोहजालात फसल्याने त्याला पुढील सर्व "उपचार' करण्याशिवाय पर्याय नसतो. परिणामी, कुटुंब उद्‌ध्वस्त होईपर्यंत तो "मामी'च्या तालावर नाचतो. जेव्हा त्याला आपली चूक उमगते, तेव्हा तो पूर्णपणे बरबाद झालेला असतो. "मामी'च्या पुढाकाराने अशा पद्धतीने बरबाद झालेल्यांची संख्या काही हजारांच्या घरात असल्याचे सांगण्यात येते.

झटपट श्रीमंतीसाठी `हनी ट्रॅप`

नगरच्या केडगाव परिसरात "गणेश'नामक व्यक्तीच्या माध्यमातून "मामी'ने थेट "चंद्रगुप्त' गाठले. पुढे "संभाजीं'च्या कृपेने "मामी'ची समाजातील विविध स्तरांत चांगली ओळख व "इमेज'ही झाली. मात्र, मामीला झटपट श्रीमंत व्हायचे होते. तिने "हनी ट्रॅप'चा धंदा स्वतः एकटीनेच सुरू केला. तथापि, टोळी असल्याशिवाय या ट्रॅपमध्ये "ड्रामा' करता येत नाही व जादा पैसाही मिळत नाही, असे "मामी'च्या लक्षात आले. त्यामुळे "सक्षम' मास्टरमाइंड व म्होरक्‍याचा शोध घेतला असता, "हनी ट्रॅप' टोळीचे सध्याचे मास्टरमाइंड व म्होरक्‍या "मामी'च्या गळाला लागले. त्यानंतर "मामी'चे "कामकाज' जोरात सुरू झाले. तिची "ख्याती' परराज्यांतही पसरली. मामीने "पैशांचा पाऊस' पाडण्याचा बनाव करून केडगावातील एका ब्यूटी पार्लर चालिकेकडून साडेतीन लाख उकळल्याची घटना मोठ्या चवीने चर्चिली जाते. संबंधित महिलेने आत्महत्येची धमकी देऊनही "मामी'ने तिला दाद तर दिली नाहीच; उलट आपले भाडोत्री पोलिस तिच्यावर सोडले.

किती दिले नरबळी

"हनी ट्रॅप'च्या माध्यमातून चांगला पैसा येऊ लागला असतानाही "मामी'चे मन भरत नव्हते. तिने नवऱ्याच्या मदतीने नगर तालुक्‍यातील एका गावात एका बाळाचा नरबळी देण्याचा केलेला प्रकार वेळीच उघडकीस आला. त्या वेळी ग्रामस्थांनी त्यांना चोप देत पिटाळून लावले. पुण्यात स्थायिक झाल्यानंतर "मामी'ने तेथेही पुन्हा नरबळीचा प्रकार केला. अकोले व जालना येथेही त्याचीच पुनरावृत्ती झाली. विशेष म्हणजे, एवढे "अघोरी' प्रकार करूनही "मामी'चे कोणीच काही करू शकले नाही. साहजिकच, मामीचा आत्मविश्‍वास वाढला. जोडीला असलेल्या "परुळेकर'च्या "रमेश'ची स्टाईल "मामी'च्या "उपक्रमा'त मोठी भूमिका निभवायची. त्यामुळेच मामीचे "कवित्व' जोरात चालायचे व त्याचे "परा'ळेही लोकांना भावायचे.

पोलिसाचा लाळघोटेपणा, बनला तिचा `बाॅडिगार्ड`

सर्व बिनबोभाटपणे सुरू असताना मामीला राजकारण्यांसह विविध क्षेत्रांतील "डॉन' मंडळींचे संरक्षण मिळत गेले. पोलिस खात्यातील पाटलांचा संदीप तर "मामी'चा "माइंड गार्ड'च होता. "मामी'ने लुटमार केलेल्यांपैकी कोणी "मामी'ला पैसे परत मिळण्यासाठी त्रास देत असेल, तर पाटलांचा संदीप लागलीच "मामी'च्या मदतीला धावून जायचा. इतकेच नव्हे, तर "तुम्ही मामीला फोन करून त्रास देऊ नका, नाही तर तुम्हाला जेलची हवा खावी लागेल,' असेही धमकावायचा. त्यामुळे "मामी'ला व तिच्या समाजविघातक कृत्यांना पोलिस अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत "झेड प्लस' दर्जाची सुरक्षाच होती, असे म्हणावे लागेल. 

आता अंत दूर नाही

"हनी ट्रॅप'सह "नरबळी', "गंडादोरा', "काळी जादू', तसेच इतर विविध प्रकारच्या समाजविघातक कृत्यांना सरकारी यंत्रणा व राजकीय मंडळी बिनबोभाटपणे पाठीशी घालीत होती. त्यामुळे "मामी', "हनी ट्रॅप' टोळीचा मास्टरमाइंड, म्होरक्‍या, "लैला' व पंटर मंडळींना हटकण्याची हिंमतही कोणामध्ये नव्हती. मात्र, "सकाळ'ने "हनी ट्रॅप' टोळीचा पर्दाफाश केल्याने आता फसविली गेलेली अनेक मंडळी पुढे येत आहेत. बोलण्याची व सांगण्याची हिंमत करीत आहेत. परिणामी, आता या टोळीचा कायदेशीर अंत फार लांब नाही, हेही तेवढेच खरे!

मोठ्यांबरोबरच छोटे "बकरे'ही केले हलाल!

"मामी' व टीमने "हनी ट्रॅप'सह गंडादोरा, काळी जादू, पैशांचा पाऊस अशा "उपक्रमांत' मोठमोठे "बकरे' शोधून त्यांची "शिकार' केली. नगर शहर, केडगाव व परिसरातील छोटे उद्योजक, राजकीय कार्यकर्ते, शासकीय व अशासकीय कर्मचारी, तसेच सामान्य व्यक्तींनाही या टोळीने आर्थिक चणचण भासल्यावर लुटण्याचे पाप केले आहे. मोठे "बकरे' इज्जत जाईल या भीतीने व छोटे "बकरे' "मामी'च्या पुढे आपले काहीच चालणार नाही, या हतबलतेने आजतागायत गप्प होते. "सकाळ'मधील बातम्यांमुळे त्यांना आता धीर येत असून, ते बोलू लागले आहेत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख