होम क्वारंटाईन ! आमदार राजळे घेतात दूरध्वनीवरून आढावा - Home quarantine! MLA Rajale takes a review over the phone | Politics Marathi News - Sarkarnama

होम क्वारंटाईन ! आमदार राजळे घेतात दूरध्वनीवरून आढावा

मुरलीधर कराळे
बुधवार, 22 जुलै 2020

कोरोनामुळे मतदारसंघात कामे करताना काही कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे पाथर्डी-शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे स्वतःच होम क्वारंटाईन झाल्या आहेत.

नगर : कोरोनामुळे मतदारसंघात कामे करताना काही कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यामुळे पाथर्डी-शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे स्वतःच होम क्वारंटाईन झाल्या आहेत. सध्या या मतदारसंघात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता त्या अधिकारी, कार्यकर्त्यांना दूरध्वनीवरून रोज संपर्क करून आढावा घेत आहेत. अधिकाऱ्यांना तशा सूचना देत आहेत.

पाथर्डी तालुक्यात मागील आठ दिवसांमध्ये रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंत 132 रुग्णांची तालुक्यात नोंद झाली आहे. त्यामुळे प्रशासन सज्ज झाले आहे. पदाधिकारीही गेल्या आठ दिवसांपासून नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत आमदार राजळे रोज अधिकाऱ्यांशी दुरध्वनीवरून माहिती घेतात. ज्या भागात अडचणी आहेत, तेथे सुविधा देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या मार्फत प्रयत्न करीत आहेत. पाथर्डी तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये ऊसतोड कामगार आहेत. ग्रामीण भागात रुग्ण वाढले, तर ते आटोक्यात आणणे अवघड जाणार आहे. त्यामुळे पाथर्डी तालुका सध्या पूर्ण बंद ठेवण्यात आला आहे. पाथर्डी शहरातील सर्व व्यवहार सध्या ठप्प आहेत. 

शेवगाव तालुक्यात सध्या 45 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. शेवगाव शहरही 28 जुलैपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. या तालुक्याशी संबंध औरंगाबाद जिल्ह्याशी येतो. सध्या तेथे रुग्णांचे तांडव सुरू आहे. जिल्हा बंदीचे नियम डावलून अनेकजण तालुक्यात विविध मार्गाने घुसतात. त्याला आवर घालण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. असे असले, तरी विवाह समारंभानिमित्त होणारी गर्दी, बाजारपेठेतील गर्दीमुळे रुग्ण वाढण्याची शक्यता गृहित धरून संपूर्ण व्यवहार सध्या बंद करण्यात आले आहेत.

रोजचा आकडा वाढतोय धाकधुकी

पाथर्डी व शेवगाव या दोन्ही तालुक्यात प्रारंभी रुग्ण जास्त आढळून येत नव्हते, परंतु जिल्ह्यात लाॅकडाऊन काहीसे शिथिल झाल्यामुळे रोजचे आकडे धाकधुकी वाढवत आहेत. मागील आठ दिवसांपासून दोन्ही तालुक्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याला आवर घालण्यासाठी संपूर्ण लाॅकडाऊन केले असले, तरी पुन्हा रुग्ण वाढणार नाहीत, यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. आमदार राजळे सध्या दूरध्वनीवरून आढावा घेत असल्या, तरी नागरिकांनीही कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख