Hivrebazar! Such is the ideal Corona code of conduct | Sarkarnama

हिवरेबाजारची दिशाच न्यारी ! अशी आहे `आदर्श कोरोना आचारसंहिता`

मुरलीधर कराळे
मंगळवार, 26 मे 2020

कोरोना, लाॅकडाऊन यामुळे 2020 या वर्षाने मानवाला जगण्याची कला शिकविली. कोणीही एक व्यक्ती सुरक्षित नाही, तर एकोप्याशिवाय मानवाची सुरक्षा नाही, हा संदेशही दिला. याबाबत पवार यांनी `सरकारनामा`शी केलेली बातचीत..

नगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनच्या काळात आदर्शगाव हिवरेबाजर या गावाने नवी आचारसंहिता घालून दिली आहे. त्यामुळे कोरोनाला गावात `एन्ट्री` तर सोडाच, परंतु गावातील कुणीही कोरोनाबाधित होणार नाही, याचे नियोजन केले आहे. याबरोबरच पर्यावरण संवर्धन, माणवी जीवनाच्या अस्तीत्त्वाची नव्याने स्थापना करण्याच्या दृष्टीने लाॅकडाऊनचा विचार जागतिक पातळीवर व्हावा, अशी अपेक्षा राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केली आहे.

कोरोना, लाॅकडाऊन यामुळे 2020 या वर्षाने मानवाला जगण्याची कला शिकविली. कोणीही एक व्यक्ती सुरक्षित नाही, तर एकोप्याशिवाय मानवाची सुरक्षा नाही, हा संदेशही दिला. याबाबत पवार यांनी `सरकारनामा`शी केलेली बातचीत...

प्रश्न : लाॅकडाऊनच्या काळात गावासाठी कोणती आचारसंहिता तयार केली ?

पोपटराव पवार : चिनमध्ये कोरोना या आजाराची लागण झाल्याचे समजताच त्याचे धोके जाणवू लागले. त्यामुळे जागतिक पातळीवर काय परिणाम होऊ शकतात, त्याची कुणकुण लागली होती. त्यानंतर लगेचच भारतातही त्याचा शिरकाव होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाॅकडाऊनची घोषणा केली. या दरम्यान हिवरेबाजारमध्ये तातडीने सॅनिटायझरचा पहिला प्रयोग केला. प्रत्येक घरात सॅनिटायझरचे वाटप करून ते वापरण्याबाबत मार्गदर्शन केले. गावात येणारे सर्व रस्ते बंद करून वाहनांना बंदी केली. गावाच्या परवानगीशिवाय कोणीही बाहेर पडणार नाही, किंवा बाहेरील व्यक्ती येणार नाही, याची काळजी घेतली. किराणा दुकानदार, डेअरीसाठी गावातील एक वाहन देवून त्याद्वारे वाहतूक चालू ठेवली.

भाजीपाला विक्रीची व्यवस्थाही सामाजिक अंतर ठेवून केली. बाहेरील फेरीवाले बंद केले. शक्यतो गावातील भाजीपाला गावात विकण्याचा प्रयत्न केला. आवश्यकतेनुसार बाहेरून काही माल आणण्याची वेळ आल्यास त्यासाठी आवश्यकती काळजी घेणयात आली. कुणाला आैषधोपचाराची गरज पडल्यास गावातीलच डाॅक्टरांकडून उपचार करून घेण्याची सक्ती केली. गरजेनुसार शहरात जाण्याची गरज असेल, तर तशी काळजी घेवूनच उपचार करण्याचे नियोजन करण्यात आले. परंतु सर्वजण घरात असल्याने तशी वेळ आली नाही. काही लोकांचे मुंबईत बॅंक अकाउंट आहेत. त्यांना पैसे काढण्यासाठी अडचणी आहेत. त्या पार्श्वभूमीवर गावातून त्यांची पैशाची गरज भागविली.

प्रश्न : ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी काय केले ?

पोपटराव पवार : कोरोना ग्रामसुरक्षा समिती, हिवरे बाजार, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व जिल्हा परिषद 9 आरोग्य विभागातर्फे हिवरेबाजारमधील 303 कुटुंबांतील 1404 व्यक्तींची तपासणी झाली. यासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांनी परिश्रम घेतले. ग्रामस्थांमध्ये सर्वसाधारणपणे 80 ते 90 फॅरनहाइट तापमान आढळून आले. एकाही कुटुंबात आजारी व्यक्ती आढळली नाही. 22 मार्चपासून गावाने स्वत:ची आचारसंहिता तयार केली होती. त्याअंतर्गत संपूर्ण गावाची तपासणी करण्यात आली. हिवरेबाजारमध्ये बाहेरून आलेल्या एकूण 68 व्यक्तींना घरातच क्वारंटाईन केले होते. सध्या नव्याने आलेल्या 12 व्यक्तींना क्वारंटाईन करून प्रशिक्षण केंद्रात स्वतंत्र ठेवण्यात आले आहे. किराणा, दूध, शेतीमाल व बाहेरील ये-जा याचे व्यवस्थित नियोजन करून, सुरक्षित अंतर ठेवल्यामुळे कोरोनाला गावात येता आले नाही. 

 

प्रश्न : पाहुण्यांची ये-जा, विवाह समारंभासाठी काय सांगाल ?

पोपटराव पवार : गावातील लोकांनी पाहुणा म्हणून कुठे जायचे नाही, तसेच बाहेरील व्यक्तीला गावात बोलावयाचे नाही, असे ठरविले. लाॅकडाऊनच्या काळात कार्यक्रमच होणार नसल्याने पाहुण्यांनी गावात येवू नये, असेच नियोजन करण्यात आले. त्यामुळे बाहेरील व्यक्तीचा गावात प्रवेश होऊ शकला नाही. लाॅकडाऊन काही अंशी शिथिल झाल्यानंतर काही प्रमाणात ये-जा सुरू झाली, तरीही त्याची माहिती गावाला दिली जात होती. त्यामुळे तशी काळजी घेण्यात येत होती. लाॅकडाऊनच्या काळात गावात तीन विवाह झाले. तेही शासनाच्या नियमाप्रमाणे सामाजिक अंतर, व्यक्तींची संख्या, सॅनिटायझरचा पुरेसा वापर असे सर्व नियम करून उरकण्यात आले. लाॅकडाऊन शिथिल केल्यानंतर प्रशासनाने केवळ 50 व्यक्तींमध्ये विवाह करण्याची अट घातली आहे. ती खरोखर चांगली आहे.

आगामी काळात सर्वच विवाह असेच होणे आवश्यक आहे. वाढदिवसालाही पाच-पाच लाख खर्च होत होतात. त्यातील अर्धा खर्च तर व्यसनावर होत होता. तो आता कोरोनाने थांबला आहे. विवाहाबाबत तर कायदा केला पाहिजे. आता 50 व्यक्तींच्या पुढे विवाहास उपस्थिती नसावी, असा कायदा केंद्र व राज्य सरकारने करायला हवा. आता हीच संधी आहे. त्याचे फायदे-तोटे लोकांना कळाले आहेत. त्यामुळे आता कायदा केला, तर तो यशस्वी होऊ शकेल. लोकही याबाबत मान्य करतील.

प्रश्न : लाॅकडाऊनचे निसर्गाबाबत काय फायदे झाले ?

पोपटराव पवार : लाॅकडाऊनमुळे संपूर्ण देश थांबला, उद्योग-धंदे बंद असल्याने तोटे झाले असले किंवा लोकांच्या मजुरीचा प्रश्न निर्माण झाला असली, तरी अशा गोष्टींवर मानवाने मात केली. एकमेकांना साह्य करून या संकटाचा सामना केला. परंतु एकुणच सृष्टीच्या दृष्टीने लाॅकडाऊनचे खूप फायदे झाले. प्रदुषण कमी होण्यासाठी मोठा अनुभव मिळाला. यापूर्वी ओझोनबाबत अनेक जागतिक काॅन्फरन्स झाल्या. परंतु ओझोनचा थर कमी होण्यासाठी विशेष फरक पडला नव्हता. तथापि, लाॅकडाऊनच्या काळात ओझोनचा थर कमी होण्यास मदत झाल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. जागतिक तापमान कमी झाले. प्रत्येक शहरातील प्रदुषण कमी झाले. म्हणजे लाॅकडाऊनसारख्या प्रकारामुळे प्रदुषण कमी करणे शक्य आहे, हे दाखवून दिले. खरं तर हे शासनानेच करणे आवश्यक आहे. शासन निर्णय काढायला हवे. निसर्गसंवर्धनाचा आणि सृष्टीचा बॅलन्स करायचा असेल, तर लाॅकडाऊन सक्तीचे हवे. त्यामुळे लोकांचा हव्यास थांबेल. निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी मानवाने कुठेतही थांबले पाहिजे. उत्खनन, जंगलतोड, वाळुउपसा अशा नैसर्गिक संपत्तीची होणारी हानी टळू खकेल.

प्रश्न : `खेड्याकडे चला`, या उक्तीला बळ मिळाले का?

पोपटराव पवार : नक्कीच. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेड्याचे महत्त्व विषद करताना `खेड्याकडे चला` असा संदेश दिला. कोरोनामुळे खेड्याचे, शेतीचे महत्त्व लोकांना कळाले आहे. शहरात कितीही पैसा मिळविला, तरी गावात एखादे घर असावे, असे प्रत्येकाला वाटू लागले. त्यामुळे गावाची किंमत कळाली, शेतीची किंमत कळाली. पर्यावरणाच्या दृष्टीने मृदसंधारण, जलसंवर्धन, पशुसंवर्धन, मानवी वैचारिक संवर्धन, माणसाच्या विचाराचे सुद्धा संवर्धन हे लोकांनी जवळून पाहिले. एकटा माणूस सुरक्षित राहू शकत नाही. आगामी काळात लोकसहभाग अटळ झाला आहे. प्रत्येक गावात एक पाॅझिटिव्ह गट तयार होईल. गावाच्या सुरक्षेसाठी तो प्रयत्न करील. खेडी समृद्ध होण्यासाठी हे विचार खूप प्रेरणादायी ठरणार आहेत. शहरातून खेड्यात आलेल्या मंडळींना खेड्यातील प्रश्न कळणार आहेत. ते सोडविण्यासाठी त्यांचीही मदत होईल. शिवाय गावाकडील सुंदर वातावरण, निसर्गाची साथ-संगत घेण्यासाठी शहरी माणूस यापुढे आपोआप गावांकडे वळेल. त्यामुळे `खेड्याकडे चला` या उक्तीला नक्कीच बळ मिळाले आहे. 

प्रश्न : आगामी काळात लाॅकडाऊनसारखे निर्णय घेणार आहात काय?

पोपटराव पवार : होय. पुढच्या वर्षी याच काळात सुटीच्या दिवसांत एप्रिल किंवा मे मध्ये दहा दिवस लाॅक डाऊन करणार आहोत. किंवा सहा महिन्यांच्या अंतराने पाच–पाच दिवस लाॅकडाऊन करण्याचा विचार आहे. त्यामुळे लोकांना स्वतःच्या कुटुंबाला वेळ देण्यास मदत होईल. घरातील कर्त्या पुरुषाला घरातील लहान-मोठे प्रश्न त्यामुळे कळतील. गावातील निसर्गसंवर्धन होण्यासाठी या काळात विशेष प्रयत्न करता येतील. गावातील सर्व लोक गावातच असल्याने वेगळ्या उपक्रमांचे प्रबोधन, नियोजन करणे शक्य होईल. त्यामुळे आगामी काळात दरवर्षी लाॅकडाऊनसारखा उपक्रम राबविणार आहोत. खऱं तर देशभरातच नव्हे, तर जगभरात असे करण्याची गरज आहे. ठराविक दिवस ठरवून त्या काळात संपूर्ण देशात किमान पाच दिवस तरी लाॅक डाऊन करण्याची गरज आहे. त्यामुळे प्रदुषण कमी होईल.

माणसांमध्ये आपुलकीची भावना तयार होईल. सर्व धर्मियांमध्ये बंधुभावाचे वातावरण तयार होईल. 14 एपिलला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली. ती खऱ्या अर्थाने डाॅ. आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली जयंती झाली. अशीच परिस्थिती इतर सर्व धर्मियांचीही आहे. अल्ला हलाला अभिप्रेत असलेला रमजान कोरोनामुळे शांततेत झाला. हिंदु सणांमध्येही तेच झाले. यात्रा-जत्रांमध्ये होणारा गोंधळ गेला. आगामी काळात अशा यात्रा अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने व काळजीपूर्वक होतील, असे वाटते. 

प्रश्न : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्याबाबत काय सांगाल ?

पोपटराव पवार : यापुढे वर्षभर दक्षता घ्यावीच लागेल. 2020 हे वर्ष मानवी अस्तित्त्वाची शंका घेणारे आहे. मानवी अस्तित्त्वाची नव्याने स्थापना करण्याचे हे वर्ष आहे.  भविष्यकाळात आणखी काय येईल, त्या दृष्टीने वैचारिक मंथन यातून होणार आहे. तशी तयारी आतापासूनच सुरू होईल. आता पुढे काय हवयं, पैसा की आनंद, हे मानवाला ठरवावे लागेल. गेल्या पाच वर्षात आम्ही तेच धोरण धरले आहे. आनंद मिळेल, एव्हढाच पैसा हवा. निसर्गाच्या साधनांचा वापरही तेवढाच करा. गरजेपेक्षा जास्त हव्यास नको, याबाबत विचार करावा लागेल. समारंभातील अनावश्यक खर्चाला आपोआप ब्रेक बसेल. सर्वात महत्त्वाचे खेड्याचे महत्त्व लोकांना पटेल. मानवी आरोग्याच्या दृष्टीने विचार होऊन शेती व्यवसाय सर्वश्रेष्ठ होईल, अशी आशा आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख