अकोल्यात पिचड यांना दणका ! हा भाजप नेता काॅंग्रेसमध्ये जाणार - Hit Pitched in Akola! This BJP leader will go to Congress | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा. याशिवाय सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांनीही त्या पुढे ढकलाव्यात अशी राज्य सरकारची सूचना
Breaking - दहावी-बारावीच्या परिक्षा पुढे ढकलल्या

अकोल्यात पिचड यांना दणका ! हा भाजप नेता काॅंग्रेसमध्ये जाणार

शांताराम काळे
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

राष्ट्रवादीतून भाजपात आलेले जेष्ठ नेते मधुकर नवले, तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे मीननाथ पांडे हे काँग्रेस पक्षात लवकरच प्रवेश करणार असल्याचे संकेत आहेत. या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे.

अकोले : आगामी काळातील नगरपंचायत, अगस्ती साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्याचे वातावरण ढवळू लागले आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपचे नेते माजी आमदार वैभव पिचड यांचे समर्थक मधुकर नवले काॅंग्रेसच्या वाटेवर आहेत. हा पिचड यांना मोठा दणका समजला जातो. 

राष्ट्रवादीतून भाजपात आलेले जेष्ठ नेते मधुकर नवले, तसेच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे मीननाथ पांडे हे काँग्रेस पक्षात लवकरच प्रवेश करणार असल्याचे संकेत आहेत. या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे  अकोले नगरपंचायत व अगस्ती कारखाना निवडणुकीपूर्वीच हा प्रवेश होत असल्याने या प्रवेशाला महत्व प्राप्त झाले आहे.

मधुकर उर्फ भाऊ नवले यांनी १९७८ साली लाल निशाण व लाल ध्वज खांद्यावर, लाल सलाम करत भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे सदस्यत्व स्विकारले होेते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम केले होते. परंतु पिचड यांच्या भाजप प्रवेशानंतर तेही भाजपमध्ये गेले. भाजप पक्षात ते फार रमले नाहीत. आता त्यांनी मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत बोलताना नवले म्हणतात, की माजी मंत्री हे आपणाला आजही श्रध्येय आहेत, मात्र भाजपचे शेतकऱ्याबद्दलचे ध्येय-धोरणे मान्य नाही, तर तालुका राष्ट्रवादीबाबत अस्पष्ट भूमिका, केंद्रसरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात त्यांनी टीका केली आहे. त्याचवेळी त्याचा काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय झाला होता.

संगमनेर साखर कारखान्याचे माजी संचालक व अगस्ती कारखान्याचे संचालक मीननाथ पांडे यांनी माजी मंत्री मधुकर पिचड यांचे खंदे समर्थक म्हणून चाळीस वर्षे काम केले. विधानसभेनंतर राष्ट्रवादीत राहण्याचे ठरविले होते, मात्र राष्ट्रवादीमध्ये त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली नाही. लोकप्रतिनिधींनी विविध प्रश्नांना हात घालून ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते, तालुक्याच्या पाटपाण्याचा कालव्यच्या प्रश्नाबाबत त्यांच्याकडून अपेक्षाभंग झाल्याचे पांडे यांनी सांगितले.

या उलट मंत्री बाळासाहेब थोरात यांची तालुक्याचे प्रश्न सोडविण्यासाठी निश्चित मदत होईल. त्यामुळे आपण काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे, लवकरच तारीख घेऊन काँग्रेस पक्षात सहभागी होऊ, असे त्यांनी सांगितले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख