त्यांची साडेसाती वाढली, पुन्हा मीच आमदार होणार : आमदार लहामटे - His number has increased to one and a half, I will be an MLA again: MLA Lahamate | Politics Marathi News - Sarkarnama

त्यांची साडेसाती वाढली, पुन्हा मीच आमदार होणार : आमदार लहामटे

शांताराम काळे
रविवार, 19 जुलै 2020

मागील वर्षी गटारी आमावस्येच्या दिवशीच माजी आमदार वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या पार्श्वभूमीवर बोलताना आमदरा डाॅ. लहामटे यांनी पिचड यांना चिमटा काढला.

अकोले : विरोधकांनी कितीही कुभांड रचले, तरी मी कमी पडणार नाही. त्यांचा गणिमी कावा फसलेला आहे. उद्या गटार अमावस्या आहे. त्यांना मागील वर्षी याच दिवशी साडेसाती लागली होती. ती वर्षभरात बळावली आहे. त्यामुळे अजूनही सांगतो सुधारा. टीका करणे बंद करा. जनतेच्या पाठिंब्यावर पुढील निवडणुकीतही मीच आमदार होणार आहे. आगामी काळात काही नेत्यांचे दोन नंबरचे धंदे बंद करणार आहे, असा इशारा आमदार डाॅ. किरण लहामटे यांनी दिला.

मागील वर्षी गटारी आमावस्येच्या दिवशीच माजी आमदार वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्या पार्श्वभूमीवर बोलताना आमदरा डाॅ. लहामटे यांनी पिचड यांना चिमटा काढला. त्या वेळी लागलेली साडेसाती वर्षभरातही गेली नाही. पुढेही जाणार नाही, असे सांगून आगामी निवडणुकीतही आपणच आमदार होऊ, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

यापुढे मांसाहार बंद करणार

आमदार लहामटे म्हणाले, माझ्या एका कार्यकर्त्याकडे घरगुती जेवणासाठी गेलो होतो. तेथे एकजण कोरोनाबाधित आल्याचे विरोधक म्हणतात, परंतु त्यांचा व माझा थेट संबंध आला नाही. त्यामुळेच आपण कोरोना चाचणी करून घेतली असून, ती निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे विरोधकांनी विनाकारण टीका करू नये. त्या जेवणात मी मांसाहार केला असला, तरी मागील दहा वर्षापूर्वी तो पूर्ण बंद केला होता. आधीच्या पक्षात असताना काही हितचिंतकासमवेत त्यांच्या आग्रहावरून मांसाहार सुरू केला होता. आजपासून पुन्हा तो पूर्णपणे बंद करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

तुम्हीही पहाटे उठत चला

आमदार लहामटे म्हणाले, कामाचे श्रेय घेण्यासाठी विरोधक तत्पर आहेत. मी पहाटे 5.30 ला कामाच्या स्लॅबचे उद्घाटन केले. ते दहा वाजता आले. पुन्हा उद्घाटन करून गेले. काम सुरू झाल्यानंतर नारळ वाढवितात की सुरु होण्याच्या आधी, हे त्यांनीच ठरवावे. त्यासाठी जरा लवकर उठत जा. लोकांमध्ये जात जा. तुम्हाला सकाळी जाग येत नाही, हे प्रकार सोडून द्या, असा सल्ला लहामटे यांनी पिचड यांना दिला.

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख