जड अंतःकरणाने या नेत्यांने केली 25 वर्षांची परंपरा खंडीत - With a heavy heart, these leaders broke the 25-year-old tradition | Politics Marathi News - Sarkarnama

जड अंतःकरणाने या नेत्यांने केली 25 वर्षांची परंपरा खंडीत

मुरलीधर कराळे
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

`दुधवाला शिवा` जेव्हा आमदार झाला, तेव्हा बुऱ्हाणनगरच नव्हे, तर संपूर्ण नगर तालुक्याला आश्चर्य वाटले. आपल्यातलाच माणूस आमदार झाल्याचा आनंद वाटला. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या वाढत जाऊन तब्बल 25 वर्षे ते आमदार राहिले.

नगर : राजकीय जीवनाचे सलग 25 वर्षे विजयश्री गळ्यात घेऊन मिरविताना एखादी परंपरा चालू ठेवणे अवघड असले, तरीही मतदारांच्या प्रेमापोटी या नेत्याने ही परंपरा तब्बल 25 वर्षे चालू ठेवली होती. या वर्षी कोरोनाच्या कारणामुळे मात्र ती खंडीत करण्याची वेळी भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्यावर आली.

फेसबूकवर भावनिक पोस्ट व्हायरल करून त्यांनी या वर्षी ही परंपरा खंडीत केली असली, तरी पुढच्या वर्षी नव्या उमेदीने ती सुरू करू असे म्हटले आहे.

`दुधवाला शिवा` जेव्हा आमदार झाला, तेव्हा बुऱ्हाणनगरच नव्हे, तर संपूर्ण नगर तालुक्याला आश्चर्य वाटले. आपल्यातलाच माणूस आमदार झाल्याचा आनंद वाटला. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या वाढत जाऊन तब्बल 25 वर्षे ते आमदार राहिले. आमदार झाल्यापासून पहिल्याच वर्षी त्यांनी दिवाळी पाडव्याला मतदारसंघातील लोकांसाठी फराळ कार्यक्रम करण्याचे नियोजन केले. मागील विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला, तरीही त्यांनी खचून न जाता लोकांचे प्रश्न जनता दरबार भरवून सोडविण्याचे पुर्वीप्रमाणेच काम सुरूच ठेवली. ही परंपरा त्यांची चालूच आहे, मात्र दिवाळी पाडव्यानिमित्त आयोजित फराळ कार्यक्रम मात्र या वर्षी खंडीत करण्यात आला आहे. याबाबत कर्डिले यांनी फेसबूकवर भावनिक पोस्ट व्हायरल केली आहे.

सोशल मीडियावर त्यांनी म्हटले आहे, की गेली 25 वर्षांपासून मी दिवाळी सणानिमित्त फराळ कार्यक्रमाचे आयोजन करीत होतो. मात्र यंदा कोरोनाच्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतोय. मला खात्री आहे, आपण सर्वजण या सणासुदीच्या काळात अनावश्यक गर्दी टाळून, सामाजिक अंतर पाळत लवकर या संकटातून बाहेर पडू व सर्व उत्सव मोठ्या जोमाने सुरू करू. दीपावली पाडव्यानिमित्त फराळाची ही परंपरा या वर्षी खंडीत झाली असली, तरी पुढील वर्षी नव्या जोमाने आपण एकत्र येवू. 

दरम्यान, बहुतेक आमदार पाडव्यानिमित्त लहान-मोठे कार्यक्रम आयोजित करीत असतात, मात्र कर्डिले यांनी राबविलेल्या या उपक्रमाची दखल राज्यपातळीवर घेतली जात होती. याबाबत अनेकदा पक्ष कार्यालयात वरिष्ठांनी या उपक्रमाची दखल घेतल्याने इतर आमदारांनीही तशा पद्धतीचे उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. लोकांशी संपर्क टिकून राहण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे असून, हेच कर्डिले यांच्या राजकारणाचे गमक होते, असे राजकीय वर्तुळातून बोलले जाते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख