नगर : ``मुख्यमंत्री फक्त एकमेकांचे रुसवे- फुगवे काढण्यात व्यस्त आहेत. शेतकऱ्यांना कोणतीही मदत नाही, पण मंत्र्यांसाठी गाड्या खरेदी करणाऱ्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काॽ`` असा सवाल आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
शिर्डी येथे नगर - मनमाड रस्त्यावर विखे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली दूधप्रश्नी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी विखे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. घोषणाबाजी करून सरकारच्या विरोधात आसूड ओढण्यात आले. दूध उत्पादकांच्यावतीने मागण्यांचे निवेदन आमदार विखे पाटील यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना दिले. या आंदोलनात गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ, तालुका दूध संघाचे अध्यक्ष रावसाहेब देशमुख उपस्थित होते.
सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही
विखे पाटील म्हणाले, ``सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही, तुम्ही जनतेच्या मनातून केव्हाच पडले आहात. आता केवळ बैठकांचा फार्स करू नका. दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा शेतकऱ्यांचा एल्गार मंत्रालयावर येवून धडकेल. मुख्यमंत्री मुलाखतीतून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची थट्टा करीत आहेत. कोरोना संकटात शेतकऱ्यांना कोणतीही मदत सरकार करु शकले. राज्यात युरीया खताचा काळाबाजार सुरू आहे. सोयाबीन बियाणात शेतकऱ्यांची फसवणूक झाली, पण एकाही खासगी कंपनीवर सरकारने गुन्हे दाखल केले नाहीत. दुबार पेरणीसाठी सरकारने शेतकऱ्यांना कोणतीही मदत जाहीर केली नाही.``
भाजप कार्यकर्त्यांकडून एल्गार
दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलना दरम्यान सरकारविरोधी घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. आगामी काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन अधीक तीव्र करू, असा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला.

