नगरसेवक पक्षांतरप्रकरणी त्यांचेच हसू झाले : विजय औटी - He smiled at the corporator transfer case: Vijay Auti | Politics Marathi News - Sarkarnama

नगरसेवक पक्षांतरप्रकरणी त्यांचेच हसू झाले : विजय औटी

मुरलीधर कराळे
बुधवार, 8 जुलै 2020

त्या नगरसेवकांच्या पाण्याविषयी तक्रारीत काहीच तथ्य नव्हते, केवळ राजकारण करून काहीतरी कारणे द्यायची हा पोरखेळ झाला. अशा पोरखेळाचे राजकारण करून लोकप्रतिनीधींनी तालुक्याचे वाटोळे करू नये.

पारनेर : पारनेरच्या घडामोडीमुळे त्यांचेच हसू झाले. अशा पद्धतीने पक्षांतर करणे योग्य नव्हते. त्या नगरसेवकांच्या पाण्याविषयी तक्रारीत काहीच तथ्य नव्हते, केवळ राजकारण करून काहीतरी कारणे द्यायची हा पोरखेळ झाला. अशा पोरखेळाचे राजकारण करून लोकप्रतिनीधींनी तालुक्याचे वाटोळे करू नये, असा दणका शिवसेनेचे नेते, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांना लगावला.

पारनेर नगरपंचायतीचे पाच नगरसेवक शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेले होते. महाआघाडी सरकारमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी दोन्ही मित्र पक्ष असल्याने एकमेकांच्या फोडाफोडीच्या राजकारणाबाबत राज्यभर चर्चा झाली. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन आज त्या नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत पाठविण्यात आले.

या नाट्यमय घडामोडीबाबत `सरकारनामा`शी बोलताना औटी म्हणाले, ``तालुक्याच्या राजकारणाचा पोरखेळ झाला आहे. सर्वांना माहिती आहे, की 2005 साली सुपे औद्योगिक वसाहतीस मी पाणी आणले. पारनेरमध्येही पाण्याच्या खूपशा अडचणी नाहीत. मात्र केवळ राजकारण करायचे म्हणून त्यांनी पाण्याचे कारण सांगितले. याबाबत मी वरिष्ठांशी संपर्कात होतो. त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्रात शिवसेना व राष्ट्रवादीत पायंडा पडला असता, त्यामुळे त्यांची वापसी निश्चित होती. यानिमित्ताने महाराष्ट्रात एक चांगला संदेश गेला आहे. शिवसेना व राष्ट्रवादी दोन्हीही पक्ष चांगले काम करीत असताना अशा प्रकारांमुळे विरोधकांना चर्चेला जागा होते. यापेक्षा वेगळे काही होत नाही.``

भाजपचे ते नाटकच होते

ते नगरसेवक भाजपमध्ये चालले होते. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीत ओढले, हे धादांत खोटेे आहे, असे सांगून औटी म्हणाले, की ते कुठेच चालले नव्हते. ते भाजपच्या संपर्कात नसल्याचे भाजपच्या तालुकाध्यक्षांनी पत्रकही काढले होते. त्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नव्हता. हे केवळ नाटक होते. घडत असलेल्या घडामोडींचे राज्यात काय पडसाद पडतील, याच्या परिणामाची जाणीव संबंधितांना आली नसावी. त्यामुळे हा प्रकार घडला आहे. विरोधकांच्या नावाने चुकीचे संदेश देणे हा राजकारणाचा भाग नसावा. मुरब्बी राजकारण्यांकडून असे होत नसते, असे सांगून औटी यांनी आमदार लंके यांना टोला लगावला.

माझी मुंबईला जाण्याची गरज नव्हती

आपण या घडामोडींपासून अलिप्त होता काय, असे विचारले असता औटी म्हणाले, की मी अलिप्त कसा असेल. माझी आज तेथे जाण्याची गरज नव्हती. कारण मी वरिष्ठांच्या संपर्कात होतो. ते पुन्हा शिवसेनेत येणे आवश्यक होते. राज्यपातळीवरील राजकारणात पोरखेळासारखे वागून चालत नसते. मी वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे मला मुंबईला जाण्याची गरज पडली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख