रस्त्याच्या दूरवस्थेची व्यथा मांडली थेट राज्यपाल कोश्यारी यांच्यासमोर - He expressed his grief over the remoteness of the road directly to Governor Koshyari | Politics Marathi News - Sarkarnama

रस्त्याच्या दूरवस्थेची व्यथा मांडली थेट राज्यपाल कोश्यारी यांच्यासमोर

सतीश वैजापूरकर
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021

टोल'वसुली सुरू आणि डागडुजी बंद होती. आपण सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे वारंवार या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे.

राहाता : नगर-कोपरगाव रस्त्याची दुरवस्था झाल्याने अपघात व बळींची संख्या वाढत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना सरकारला द्याव्यात, अशा आशयाचे निवेदन डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना दिले. या वेळी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रशांत बंब उपस्थित होते. 

निवेदनात म्हटले आहे, की या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला. आपण त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. मात्र, हे काम सुरू होईपर्यंत रस्त्याची डागडुजी तातडीने केली जावी. खड्ड्यांमुळे या रस्त्यावर रोज अपघात होऊन लोकांचे बळी जात आहेत. आपण याबाबत राज्य सरकारला सूचना द्यावी.

हेही वाचा... आमदारांच्या कुटुंबियांसाठीच जिल्हा बॅंक आहे का 

हा रस्ता खासगी कंपनीकडे होता. "टोल'वसुली सुरू आणि डागडुजी बंद होती. आपण सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे वारंवार या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. शिर्डीसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्याची अशी दुरवस्था व्हावी, ही बाब महाराष्ट्राच्या दृष्टीने भूषणावह नाही. सरकारचे याकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे. 

 

हेही वाचा... 

कोते, गायके स्वीकृत नगरसेवक 

शिर्डी : नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी आज रवींद्र विलास कोते व अशोक भाऊसाहेब गायके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. प्रांताधिकारी गोविंद शिंदे व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे निवडणूक प्रक्रिया पार पाडली. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काल सर्व नगरसेवकांची बैठक घेऊन या दोघांची नावे सर्वानुमते निश्‍चित केली होती. 

हेही वाचा... त्या शेतकऱ्यांकडून पैसे वसुलीत नगर नंबर वन

रवींद्र कोते संघपरिवारातून पुढे आलेले भाजयुमोचे सक्रिय पदाधिकारी आहेत, तर अशोक गायके शिर्डी युवा ग्रामस्थ संघटनेत सक्रिय आहेत. या दोघांची निवड करून खासदार विखे पाटील यांनी मूळ भाजप व विखे समर्थकांचा मेळ साधला. काल त्यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीस या दोन्ही नावांवर शिक्कामोर्तब झाले. निवड निश्‍चित असल्याने विखे पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपनगराध्यक्ष हरिश्‍चंद्र कोते, नितीन कोते व ताराचंद कोते उपस्थित होते. आज निवडणूकप्रक्रिया सुरू झाल्यानंतर मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्याकडे या दोघांचेच अर्ज आले. निर्धारित वेळेनंतर पीठासीन अधिकारी गोविंद शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. 

 

Edited By- Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख