सफाई कर्मचाऱ्यांप्रती अशीही कृतज्ञता, सन्मानपत्र देऊन केला गाैरव - He also expressed his gratitude to the cleaners and gave them certificates | Politics Marathi News - Sarkarnama

सफाई कर्मचाऱ्यांप्रती अशीही कृतज्ञता, सन्मानपत्र देऊन केला गाैरव

मुरलीधर कराळे
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

कोरोनाला घाबरून बहुतेक लोक घर सोडत नाही. मात्र सफाई कर्मचाऱ्यांना बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही. रस्ते, कचराकुंड्या स्वच्छ करून हे कोरोना वाॅरिअर अविरत काम करीत आहेत.

नगर : कोरोनाला घाबरून बहुतेक लोक घर सोडत नाही. मात्र सफाई कर्मचाऱ्यांना बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही. रस्ते, कचराकुंड्या स्वच्छ करून हे कोरोना वाॅरिअर अविरत काम करीत आहेत. त्यानिमित्त त्यांचा गाैरव `नगर जल्लोष`च्या वतीने नुकताच करण्यात आला. 

तोफखाना परिसरातील नागरिक व नगर जल्लोष ट्रस्टच्या वतीने हा सत्कार सोहळा नुकताच झाला. माजी नगरसेवक अॅड. धनंजय जाधव यांच्या हस्ते सफाई कर्मचाऱ्यांना मानपत्र देऊन त्यांचा गाैरव झाला. ट्रस्टचे अध्यक्ष सागर बोगा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब विधाते, सागर सुरपुरे, राजेंद्र सामल, राजू पठाडे, संतोष वैरागर, गोरख भालेराव आदी उपस्थित होते.  

सामाजिक जाणिवेतून संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेची मशाल हाती घेऊन शहर व गावोगावी जाऊन हातात झाडू घेऊन स्वच्छता केली. समाजामध्ये जनजागृती केली. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटावे, म्हणून कीर्तनाद्वारे प्रबोधन केले. अशाच प्रकारे समाजाचे आरोग्य अबाधित राहण्याचे काम आता महापालिकेचे सफाई कर्मचारी दररोज पहाटे कुठलाही खंड न पडता करीत आहेत. तोफखाना परिसरातील सफाई कर्मचारी कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये अगदी कॅन्टोन्मेंट झोन असतानाही आपल्या आरोग्याची पर्वा न करता नागरिकांना धीर देत प्रभागातील स्वच्छता करीत होते. कोरोनाच्या काळामध्ये नागरिक भयभीत झाले आहेत. परंतु आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडत आहेत. त्यामुळेच नगर जल्लोष या संघटनेच्या वतीने अशा कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा गाैरव करण्यात आला,

या वेळी बोलताना अॅड. जाधव म्हणाले, तोफखाना भागामध्ये कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यावेळी या भागातील नागरिक भयभीत झाले होते. मात्र सफाई कर्मचाऱ्यांनी प्रभागातील नागरिकांना धीर देण्याचे काम केले होते. तसेच प्रभाग स्वच्छ ठेवण्याचे काम, सफाई कर्मचारी हा प्रत्यक्ष आपापली जबाबदारी पार पाडत असतो. त्यांचा सन्मान होणे तितकेच महत्त्वाचे आहे. मी सर्व सफाई कर्मचाऱ्यांचा आभारी आहे, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख