हजारे यांचे पंतप्रधानांना पुन्हा पत्र ! म्हणाले, सत्तेसाठी खोटी आश्‍वासने  देणे चुकीचे - Hazare's letter to PM again! He said it was wrong to give false promises for power | Politics Marathi News - Sarkarnama

हजारे यांचे पंतप्रधानांना पुन्हा पत्र ! म्हणाले, सत्तेसाठी खोटी आश्‍वासने  देणे चुकीचे

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 19 जानेवारी 2021

स्वामीनाथ आयोगाच्या अहवालानुसार, शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे लेखी आश्वासन पंतप्रधान कार्यालयाने 29 मार्च 2018 रोजी दिले होते.

राळेगणसिद्धी : केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दिलेल्या लेखी आश्वासनांची अद्याप पूर्तता केलेली नाही. मागण्या पूर्ण न करता येत नसतील, तर खोटी आश्वासने देणे चुकीचे आहे. त्यातून जनतेत चुकीचा संदेश जातो. सत्तेसाठी सरकार सत्य सोडते, तेव्हा खूप दुःख होते, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून भावना व्यक्त केल्या आहेत. 

पत्रात हजारे यांनी म्हटले आहे, की स्वामीनाथ आयोगाच्या अहवालानुसार, शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे लेखी आश्वासन पंतप्रधान कार्यालयाने 29 मार्च 2018 रोजी दिले होते. दीडपट हमीभाव तर दूरच; पण शेतकऱ्यांना उत्पादनखर्चही मिळत नाही. शेतकऱ्यांप्रती सरकार संवेदनशील असल्याचे सांगितले जाते, मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात? राज्य कृषिमूल्य आयोगाच्या शिफारशीत काटछाट करणाऱ्या केंद्रीय कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता देण्यासाठी उच्चस्तरीय समितीची नियुक्ती येईल, 6 हजार कोटी रुपये खर्चून भाजीपाला, फळे, दूध, फुले यांच्यासाठी शीतगृहे तयार करण्यात येतील, या आश्वासनांचे काय झाले? सरकारने खोटी आश्वासने दिल्याने मला अतिव दुःख झाले आहे. 

आतापर्यंत आपण अनेक आंदोलने केली; पण कधीही व्यक्ती वा पक्षाविरुद्ध आंदोलन केले नाही. समाज, राज्य व देशाच्या भल्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता होणे गरजेचे आहे. त्यासाठी पुन्हा एकदा जिवाची बाजी लावून आपण उपोषण करू, असा इशारा हजारे यांनी दिला आहे. 

 

हेही वाचा..

झावरे- औटी गटालाच सर्वाधिक जागा : झावरे 

पारनेर : तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीत जास्तीत जास्त ग्रामपंचायती सुजीत झावरे व विजय औटी यांच्या गटाच्या ताब्यात आहेत. मात्र, लोकप्रतिनिधी 70 ग्रामपंचायतींवर सत्ता आल्याची वल्गना करीत असून, त्यातून जनतेची दिशाभूल करीत आहेत. लोकप्रतिनिधींचा हा बालिशपणा आहे, अशी टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांनी केली. 

ते म्हणाले, की आमदारांनी ज्या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा घेतल्या, त्या ग्रामपंचायती त्यांच्या ताब्यातून गेल्या आहेत. खरे तर आमदार असणाऱ्या व्यक्तीने ग्रामपंचायत निवडणुकीत बूथवर बसून पदाची शान घालवली. विरोध हा तात्विक असावा, वैयक्तिक नसावा. मात्र, त्यांच्याकडे वैचारिक प्रगल्भता नसून, तालुक्‍याचे हे दुर्दैव आहे. बिनविरोध निवडणुका करण्याचा त्यांचा हेतू शुद्ध नव्हता. 

वासुंदे येथे 50 वर्षांत अपवाद वगळता नेहमी बिनविरोध निवडणूक होत होती. या परंपरेला लोकप्रतिनिधींनी खीळ घातली. गावातील काही लोकांना हाताशी धरून निवडणुकीस भाग पाडले. त्यांनी माझ्या गावात सभा घेऊन आमचे उमेदवार 300 पेक्षा अधिक मतांनी विजयी झाले. दुसऱ्याच्या शैक्षणिक संस्थेत हस्तक्षेप करणे, तेथे पत्नीची वर्णी लावण्याचा प्रयत्न करणे. हे सामाजिक असभ्यतेचे लक्षणे असल्याची टीका झावरे यांनी केली. 

 

Edited By - Murlidhar Karale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख