राळेगणसिद्धीतील जबाबदारी हळूहळू कार्यकर्त्यांवर टाकणार : हजारे - Hazare will gradually shift the responsibility to Ralegan Siddhi: Hazare | Politics Marathi News - Sarkarnama

राळेगणसिद्धीतील जबाबदारी हळूहळू कार्यकर्त्यांवर टाकणार : हजारे

एकनाथ भालेकर
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

गावातील कार्यकर्त्यांना मी नेहमी म्हणायचो की माझ्या आधार आता कुठपर्यंत वापरणार? परंतु आता कार्यकर्ते सक्षमपणे काम करीत असल्याने नक्कीच आनंद वाटतो.

राळेगण सिद्धी : मागील वर्षी डिसेंबरपासून मौन आंदोलन व कोरोना काळ अशा वर्षभरात मी गावात कधी लक्ष दिले नाही. पण कार्यकर्त्यांनी अनेक कामे खूप चांगली केले आहेत, त्याचा मला नक्कीच आनंद वाटला. माझी गावातील जबाबदारी कमी करून कार्यकर्त्यांवर सोपवायची एवढेच ठरविले. माझे गाव, समाज व देश यांची सेवा करण्याचे ध्येय ठरलेले आहे. शरिरात प्राण आहे, तोपर्यंत गाव, समाज व देशाची सेवा करण्यासाठी मी माझे जीवन देणार असल्याचा निर्धार कायम ठाम असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले.

विजयादशमीला पद्मावती मंदिरात ग्रामस्थांशी संवाद साधताना राळेगणसिद्धीतील आपले कार्यकर्ते चांगले काम करीत असल्याचा आनंद होत असून, आता मी गावातील कामातून हळूहळू निवृत्त होतो, असे हजारे म्हणाले होते. त्यावर समाजातून प्रतिक्रिया उमटू लागल्या. 

हजारे म्हणाले, की गावातील कार्यकर्त्यांना मी नेहमी म्हणायचो की माझ्या आधार आता कुठपर्यंत वापरणार? परंतु आता कार्यकर्ते सक्षमपणे काम करीत असल्याने नक्कीच आनंद वाटतो. राळेगण सिद्धीच्या परिवाराच्या कौटूंबिक कार्यक्रमात मी हे बोललो, ते फक्त कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी. माझी जबाबदारी कमी करून कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी. खरे तर कार्यकर्ता कधीही गावाच्या वा सार्वजनिक जीवनातून निवृत्त होत नसतो, असे हजारे यांनी स्पष्ट केले.

निवृत्ती हा शब्द कार्यकर्त्यांसाठी बरोबर नाही. राळेगणसिद्धीच्या कामाची जबाबदारी घेण्यासाठी आता कार्यकर्ते सक्षम झालेत. ही जबाबदारी काही प्रमाणात कार्यकर्त्यांवर सोपवावी, एवढाच विचार माझा आहे, असे हजारे यांनी स्पष्ट केले.

अण्णांच्या मार्गदर्शनाशिवाय काहीच करू शकत नाहीत : औटी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे आमच्या राळेगणसिद्धी परिवाराचे कुटूंबप्रमुख आहेत. संत यादवबाबा सप्ताह, पद्मावती देवी नवरात्र उत्सव व गावातील सर्व विकासकामे यात तरूण कार्यकर्त्यांचा सहभाग असला, तरी अण्णांच्या मार्गदर्शनाशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. अण्णांना आम्ही कधीही निवृत्त होऊ देणार नाही अन् तेही होणार नाहीत, असा विश्वास आहे, असे मत माजी सरपंच लाभेश औटी यांनी व्यक्त केले.

ही तर अण्णांची शाबासकी : पठारे

समाज व देशासाठी संपुर्ण आयुष्य खर्ची घातलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे राळेगणसिद्धीच्या कामातून निवृत्ती घेऊच शकणार नाहीत. गावातील युवक जबाबदारी घेऊन पुढे येत चांगले काम करतात. विकासकामे चांगली होतात असे सांगत कार्यकर्त्यांना अण्णांनी शाबासकी दिली एवढेच, असे मत राळेगणसिद्धीतील उद्योजक सुरेश पठारे यांनी व्यक्त केले.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख