हजारे - मुश्रीफ चर्चा ! अण्णांची अर्धी नाराजी दूर, उर्वरीतसाठी हे करावे लागणार - Hazare - Mushrif discussion! Half of Anna's resentment is gone, this will have to be done for the rest | Politics Marathi News - Sarkarnama

हजारे - मुश्रीफ चर्चा ! अण्णांची अर्धी नाराजी दूर, उर्वरीतसाठी हे करावे लागणार

मार्तंड बुचुडे
शुक्रवार, 24 जुलै 2020

माझी अर्धी नाराजी दूर झाली आहे. मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्यानंतरच माझी शंभर टक्के नाराजी दूर होईल, असे हजारे यांनी सांगितले.

पारनेर : भारतीय राज्यघटनेनुसार मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी यांचीच नेमणूक करावी, या हजारे यांच्या मागणीप्रमाणे आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तसे करण्याचे आश्वासन दिले, मात्र या वेळी हजारे यांची संपूर्ण नाराजी दूर झाली नाही. या बैठकिबाबत बोलताना हजारे म्हणाले, ``याबाबत माझी अर्धी नाराजी दूर झाली आहे. मात्र त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्यानंतरच माझी शंभर टक्के नाराजी दूर होईल.``

आज दुपारी मंत्री मुश्रीफ यांनी राळेगणसिद्धी येथे हजारे यांची भेट घेतली. सुमारे अर्धा तासाहून अधिक वेळ ही चर्चा झाली. या वेळी हजारे यांनी राज्यघटनेनुसार मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरकारी अधिकारी किंवा कर्माचाऱ्यांचीच नेमणूक करावी, असे असताना तुम्ही पक्षाच्या व्यक्तीची नेमणूक करत आहात, हे चूक आहे, असे सांगून त्यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण होण्याऐवजी केंद्रीकरण होत असल्याचे आठवण करून आपली नाराजी व्यक्त केली. तसेच या पूर्वी निवडणूक आयोग उच्च व सर्वोच्च न्यायालयाचेही निकालाचीही आठवण करून दिली. त्यांनीही प्रशासक नेमताना सरकारी अधिकारीच नेमावा, असे निकाल दिले असल्याचे सांगितले.

आताही त्याप्रमानेच सराकारने कार्यावाही व्हावी, अशी मागणी केली. या वेळी मुश्रीफ यांनी ती मान्य केली. तसेच राज्यपालाच्या अध्यादेशात पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार प्रशासकाची नेमणूक करावी, याचा कुठेही उल्लेख नाही, हे निर्दर्शनास आणून दिले. त्या वेळी त्यांनी तेही मान्य करत अधिकाऱ्यांचीच नेमणूक केली जाईल, असे आश्वासन दिले.

तर आंदोलन अटळ : हजारे

हजारे म्हणाले, ``आमच्या चर्चेनंतर माझे अर्धे समाधान झाले आहे, मात्र ज्या वेळी तशा प्रकारे ग्रामपंचायतींवर सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रत्यक्षात नेमणुका केल्या जातील, त्याचवेळी माझे पूर्ण समाधान होईल. मात्र आता आंदोलन करावे लागणार नाही, अशी माझी खात्री झाली आहे. जर तसे केले नाही, तर मात्र आंदोलन करावे लागेल, असेही हजारे म्हणाले.

न्यायालयाच्या अंतीम निर्णयाचा आदर करू : मुश्रीफ

या वेळी पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले, की हायकोर्टाच्या आदेशाप्रामणे निर्णय घेणार आहोत. उच्च न्यायालय सोमवारी अंतीम निर्णय देणार आहे, त्याप्रमाणे न्यायालयाचा आदार करून ग्रामपंचायतीवर प्रशासकांच्या नेमणुका करण्यात येतील. चर्चेअंती हजारे यांचे समाधान झाल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

राळेगणसिद्धीची माहिती घेण्यासाठी पुन्हा येणार

मी या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या हजारे यांच्या नाराजी विषयीच्या चर्चेबरोबरच राळेगणसिद्धी गावाच्या विकासाबाबतही व राळेगणसिद्धीत राबविलेल्या जलसंधारणाच्या कामाविषयी चर्चा केली. ही चर्चा मला राज्यातील इतर गावाच्या जलसंधारणाच्या कामासाठी उपयोगी पडणार आहे. मी राळेगणसिद्धीच्या विकासाची  माहिती घेण्यासाठी पुन्हा येणार आहे, असेही मुश्रीफ शेवटी म्हणाले. 

या भेटीच्या वेळी आमदार निलेश लंके, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, महाराष्ट्र प्रदेश काॅंग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख , संजय पठाडे आदी उपस्थित होते.

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख