या मंत्र्यांच्या गावाजवळ वाळुतस्करीचा कहर ! गाड्यांना विरोध केला, तर गाढवे केली पुढे - The havoc of sand mining near the village of these ministers! Opposed the carts, while the donkeys continued | Politics Marathi News - Sarkarnama

या मंत्र्यांच्या गावाजवळ वाळुतस्करीचा कहर ! गाड्यांना विरोध केला, तर गाढवे केली पुढे

आनंद गायकवाड
गुरुवार, 17 जून 2021

गेल्या काही वर्षापासून अवैध वाळू तस्करांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरलेल्या मुळा व प्रवरा नदीपात्रातील वाळूला तालुक्यात तसेच मुंबई, पुणे, नाशिक परिसरातील बांधकामासाठी मोठी मागणी आहे.

संगमनेर : संगमनेर (Sangamner) तालुक्यातील मुळा, प्रवरा, म्हाळूंगी नद्यांमधील अनिर्बंध वाळू उपशामुळे पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या अवैध व्यवसायात अनेकांचे हात गुंतल्याने, त्यांच्या पाठीवर असलेल्या राजकिय व प्रशासकिय वरदहस्तामुळे ठोस कारवाई होत नाही, असा आरोप करीत, बुधवारी ( ता. 16 ) रोजी संगमनेरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांनी गंगामाई घाटावरील नदीपात्रात मोठे आंदोलन केले होते. मात्र याचा कोणताही परिणाम वाळूचोरांवर झाला नसल्याची बाब उघड झाली आहे. बुधवारी सायंकाळी तसेच आजही भर दिवसा नदीपात्रातून गाढवांच्या मदतीने वाळूचोरी सुरुच होती. (The havoc of sand mining near the village of these ministers! Opposed the carts, while the donkeys continued)

गेल्या काही वर्षापासून अवैध वाळू तस्करांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरलेल्या मुळा व प्रवरा नदीपात्रातील वाळूला तालुक्यात तसेच मुंबई, पुणे, नाशिक परिसरातील बांधकामासाठी मोठी मागणी आहे. तालुक्यात कुठेही वाळूचा शासकिय लिलाव झाला नसल्याने विविध मार्गांनी तालुक्याच्या पठार भागातील मुळा तसेच प्रवरा, म्हाळूंगी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होते.

यामुळे नदीपात्रांची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता कमी झाल्याने, परिसरातील विहीरींची पाणी पातळी घटणे, पाण्याचे स्त्रोत आटणे आदींसह पर्यावरणाचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. तालुक्यातील नागरिकांनी विविध स्तरावर वाळू तस्करीला विरोध करुनही, प्रशासनाकडून कठोर कारवाई होत नसल्याने सुरु असलेली वाळू चोरी कायम चर्चेत राहीली आहे.

मंगळवारी खांडगावच्या ग्रामस्थांनी वाळू तस्करांविरोधात एल्गार पुकारला होता. तसेच दुसऱ्या दिवशी संगमनेरातील पर्यावरणप्रेमीही वाळूतस्करी विरोधात एकवटले. गौण खनिजाचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या महसूल खात्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यक्षेत्रातील ही अंधाधुंदी संपवण्यासाठी प्रशासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली होती. मात्र या आंदोलनानंतरही बुधवारी सायंकाळी रिक्षातून वाळूच्या गोण्या वाहणारे काही युवक व आज दुपारी सुमारे 16 गाढवांसह खुलेआम वाळू उपसा सुरु असल्याचे बघायला मिळाल्याने, मुजोर वाळूचोर प्रशासनालाही जुमानीत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
 

हेही वाचा..

थोरात म्हणतात,हा असेल माझ्या जीवनाचा आनंदाचा क्षण

 

 

 

 

Edited By - Murlidhar Karale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख