जामखेड : "कर्जतच्या निकालात मात्र "पंचेचाळीस'वरून "छत्तीस' कसे झाले? फुटले कोण, हे अजून त्यांना कळेना. आम्ही 50 वर्षे येथे "भजी' खाल्ली का?'' अशा शब्दांत भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढविला.
हेही वाचा... वसुलीत भेदभाव नाही ः उदय शेळके
जिल्हा सहकारी बॅंकेचे नूतन संचालक अमोल राळेभात यांच्या सत्कार सोहळ्यात डॉ. विखे बोलत होते. जगन्नाथ राळेभात, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचरणे आदी या वेळी उपस्थित होते.
डॉ. विखे पाटील म्हणाले, "आम्हालाही मानणारा वर्ग येथे आहे. राज्याच्या जडणघडणीत तुमच्या कुटुंबाचे योगदान मोठे आहे. मात्र, आम्हीही नगर जिल्ह्यात काही तरी केले असेल की नाही? पंचेचाळीसचे छत्तीस झाले, हे काही एक दिवसाचे काम नाही. माजी मंत्री (स्व.) बाळासाहेब विखे पाटील यांच्यापासून सुरू असलेल्या कामाचे हे फलित आहे. माजी मंत्री राम शिंदे यांनी निवडणुकीपूर्वी कर्जतला तीन दिवस तळ ठोकला होता. त्यामुळेच अंबादास पिसाळ यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. यापुढे भाजप व विखे गट एकत्र काम करतील.''
जिल्ह्यात केंद्राच्या माध्यमातून रस्त्याच्या कामासाठी भरीव निधी आणला. कोणी एखादे पत्र देऊन, आपल्यामुळे काम मंजूर झाले असे म्हणत असेल, तर ते चुकीचे आहे. ज्याने जे मंजूर केले, ते त्याचेच श्रेय आहे, हे मान्य केले पाहिजे.'' श्रेयवाद सोडविण्यासाठी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच उद्घाटनासाठी आणू. हे कोणाच्या पाठपुराव्याने मंजूर झाले, हे त्यांनाच सांगायला लावू, असेही डॉ. विखे पाटील म्हणाले.
हेही वाचा... परीक्षा रद्दचा निर्णय विश्वासघातकी ः विखे
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे, तालुकाध्यक्ष अजय काशीद, बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, सुधीर राळेभात, अमित चिंतामणी, ऍड. प्रवीण सानप, सोमनाथ राळेभात, पोपट राळेभात, मनोज कुलकर्णी आदी उपस्थित होते.
दोन्ही बाजूंनी मेवा खाऊ नका
ज्यांचा जनसंपर्क चांगला असेल, त्यांनाच कर्जत, जामखेड पालिका निवडणुकांत उमेदवारी मिळेल. कोणी कोणाच्या जवळचा म्हणून उमेदवारी मिळणार नाही. तसेच, उमेदवारी जाहीर करताना उशीर केला जाणार नाही. तसे राम शिंदे व आपल्यात ठरल्याचे डॉ. विखे यांनी सांगितले. दोन्ही पालिकांत भाजपची सत्ता येईल. मात्र, कार्यकर्त्यांनी दोन्ही बाजूंनी मेवा खाऊ नये. एकाच बाजूने राहा. पक्षाबरोबर राहा, असे आवाहन त्यांनी केले.
Edited By - Murlidhar Karale

