नगरच्या स्थैर्यनिधी संघाचे हसन मुश्रीफ यांनी ऐकले, अन झाला कर्जाबाबत मोठा निर्णय - Hasan Mushrif of the city's Stabilization Fund team listened | Politics Marathi News - Sarkarnama

नगरच्या स्थैर्यनिधी संघाचे हसन मुश्रीफ यांनी ऐकले, अन झाला कर्जाबाबत मोठा निर्णय

मुरलीधर कराळे
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

ग्रामीण भागातील नागरिकांनी जास्तीतजास्त या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही सुरेश वाबळे यांनी केले आहे.

नगर : ग्रामीण भागातील मालमत्तेवर कर्ज उपलब्ध होण्याच्या निर्णयासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर स्थैर्यनिधी सहकारी संघाच्या माध्यमातून यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी हा निर्णय घेतला आहे. स्थैर्यनिधी संघाच्या प्रयत्नांना यश आले आहे, अशी माहिती स्थैर्यनिधी सहकारी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी देवून मंत्री हसन मुश्रीफ यांचे आभार मानले आहेत.

ग्रामीण भागातील नागारीकांच्या मालमत्तेवर आता कर्ज उपलब्ध होणार आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ग्रामस्थांना घराच्या मालमत्तेवर बोजा चढवून बँका, पतसंस्था किंवा इतर अधिकृत वित्तसंस्थांकडून कर्ज घेता येईल, असे आदेश काढला आहे. राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर स्थैर्यनिधी सहकारी संघाच्या माध्यमातून यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. या आदेशामुळे ग्रामस्थांना बँका,पतसंस्थांकडून सुलभरित्या कर्ज उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांनी जास्तीतजास्त या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही सुरेश वाबळे यांनी केले आहे.

ग्रामविकास विभागाच्या ६ डिसेंबर २०१७ रोजीच्या शासन आदेशान्वये अशा प्रकारे घरांचे मालकीहक्क दर्शवणाऱ्या मालमत्ता कर आकारणी पत्रक नमुना ८ वर कर्जाच्या बोजाची नोंद करण्यास मनाई करण्यात आली आहे. सध्याच्या कोरोनाच्या संकटामुळे शहरासह ग्रामीण भागातील सर्वच नागरिक अडचणीत आले आहेत. ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आदी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन पुन्हा आपले आयुष्य सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे काही नागरिकांना घराच्या मालमत्तेवर बोजा चढवून कर्ज घेण्याचा इच्छा आहे. पण आदेशामुळे ग्रामस्थांना या पद्धतीने कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होत होत्या. आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा आदेशच रद्द केल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासादायक निर्णय झाला आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना पतसंस्थांचा मोठा आधार असतो. आता नागरिकांना त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवून कर्ज घेता येणार असल्याने त्यांची आर्थिक गरज लवकरात लवकर पूर्ण होवू शकते. मंत्री हसन मुश्रीफ यांनी हा महत्वाचा निर्णय घेतल्याने स्थैर्यनिधी सहकारी संघ त्यांचे आभार मनात आहे, असे उपाध्यक्ष वसंत लोढा यांनी सांगितले.
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख